पूनम अपराज / वैभव गायकर
पनवेल -एचआयव्हीसारख्या गंभीर आजाराची माहिती लपवून २६ वर्षीय तरुणीसोबत लग्न करून तिची फसवणूक केल्याप्रकरणी कोर्टाने गुन्हा दाखल केला. त्यानंतर कामोठे पोलीस ठाण्यात या गुन्ह्याप्रकरणी चौकशी सुरु असल्याची माहिती कामोठे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब तुपे यांनी लोकमतशी बोलताना दिली.२०१७ साली मे महिन्यामध्ये दोघांचे लग्न झाले. यापूर्वी तीन महिन्यांपूर्वी साखरपुडा झाल्यानंतरच नवरदेवाची तब्येत बिघडली. हे कळल्यानंतर साखरपुडा झालेल्या तरुणीने यासंदर्भात त्याच्याकडे आजारपणाबाबत चौकशी करण्यास सुरुवात केली असता नवरा टाळाटाळ करीत असल्याच्या तिच्या लक्षात आले. कामाच्या ताणामुळे आजारी पडत असल्याचे सासरच्या मंडळींकडून तरुणीला सांगण्यात आले.कामोठ्यात पत्नी राहत असून एचआयव्हीबाधित पती हा बृहन्मुंबई महापालिकेत नोकरी करतो.
दरम्यान, लग्नानंतर पतीची तब्बेत खालावल्याने त्याला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी पतीच्या घरच्यांनी साधारण ताप असल्याचे सांगून विषय टाळण्यास सुरुवात केली. त्यानंतर २०१७ च्या अखेरीस महिला देखील आजारी पडली. त्यावेळी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, सासरच्या लोकांनी साधारण ताप असल्याचे तिला सांगितले. तिला संशय आल्याने तिने वैद्यकीय अहवाल तपासला असता तिच्या रक्तात एचआयव्ही व्हायरस असल्याचे आढळून आले.
त्यानंतर याप्रकरणी फसवणूक झालेल्याप्रकरणी कोर्टाने एचआयव्हीग्रस्त पती आणि सासरच्या मंडळीविरोधात गुन्हा दाखल केला असून न्यायालयाने संबंधित प्रकरणाचे चौकशीचे आदेश 3 जानेवारी रोजी कामोठे पोलिसांना दिले आहे. याप्रकरणी कामोठे पोलीस तपास करीत आहेत. अद्याप याप्रकरणात कोणाला अटक झाली नसल्याची माहिती कामोठे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब तुपे यांनी दिली. लग्नानंतर सासरची मंडळी पतीला वारंवार औषध वेळेवर घेतलीस का ? याबाबत विचारणा करत. त्यावर मी कसली औषध विचारली असती, टोलवाटोलवीची उत्तर देऊन तू तुझं काम कर असे सांगितले जाई असे पीडित महिला म्हणाली.