लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा (मंगेश कराळे): मुंबई अहमदाबाद महामार्गावरील विरारच्या मौजे टोकरे येथील विरार फाट्याकडे जाणाऱ्या रोडवरील पिरकुंडा दर्ग्याच्या पुढे एका बॅगेतील पिशवीत महिलेचे मुंडके गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास आढळल्याने खळबळ उडाली होती. २४ तासांत ओळख पटवून या महिलेच्या हत्येचे गूढ उकलण्यात गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पोलिसांना यश मिळाले आहे. आरोपी पतीने पुत्रप्रेमापोटी पत्नीची निर्घृणपणे हत्या केली आहे. या आरोपीला तपास व चौकशीसाठी मांडवी पोलिसांच्या ताब्यात देणार असल्याची माहिती शनिवारी पत्रकार परिषदेत पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी दिली आहे.
गुरुवारी संध्याकाळी महिलेचे मुंडके मिळाल्यानंतर पोलीस आयुक्तालयातील सर्व गुन्हे शाखेचे पोलीस आणि स्थानिक पोलिसांनी महिलेची ओळख पटवून गुन्ह्याची उकल करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या टीमला घटनास्थळी सापडलेल्या बॅगेत एका ज्वेलरी शॉपचे पाकीट मिळाल्याने महिलेची ओळख पटली. त्यानंतर ती महिला नालासोपाऱ्याच्या रेहमत नगर येथील रोनक अपार्टमेंटमध्ये राहत असल्याची माहिती मिळाली. तसेच आरोपीने हत्या करून महिलेचा मृतदेह गोणीत भरून दुचाकीवरून नेला होता ती दुचाकी गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पोलिसांना मिळाल्यावर गुन्ह्याची उकल करण्यात त्यांना यश मिळाले आहे. त्यावरून आरोपी हरीश हिप्परगी (४९) याला शुक्रवारी रात्री ताब्यात घेतल्यावर गुन्ह्याची हकीकत पोलिसांना सांगितली.
हरीश आणि त्याची मयत पत्नी उत्पला (५१) हे गेल्या अनेक वर्षांपासून रेहमत नगर परिसरात राहत होते. पण उत्पला ही मुलाला पश्चिम बंगालला घेऊन जाणार असे बोलत असल्याने त्यांच्यामध्ये मुलांवरून कोटूंबिक वाद व्हायचे. हरीशचे मुलावर खूप प्रेम होते त्यामुळे त्याचा मुलाला नेण्यासाठी विरोध होता. याच कारणावरून हरिशने कंटाळून व रागाच्या भरात ८ जानेवारीला रात्री उत्पलाची गळा दाबून हत्या करत मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मुंडके शरीरापासून वेगळे करत ते एका ट्रॅव्हल्स बॅगमध्ये भरून झाडाझुडुपांमध्ये फेकून दिले. व उर्वरित शरीर एका गोणीत भरून प्रगती नगर येथील नाल्यात फेकून दिले. मुलाने आईबद्दल वडिलांना विचारल्यावर आरोपी पतीने आई उत्पला ही माहेरी पश्चिम बंगालला गेले असल्याचे सांगितले होते.
सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे, सहायक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शाहूराज रणवरे, सपोनि सुहास कांबळे, पोहवा मुकेश तटकरे, रमेश आलदर, सागर बारवकर, प्रशांत पाटील, अमोल कोरे, राकेश पवार, सुनिल पाटील, युवराज वाघमोडे, सुमित जाधव, आतिश पवार, तुषार दळवी, मनोहर तारडे, मसुब प्रविण वानखेडे, गणेश यादव, सागर सोनवणे आणि सायबरचे सफौ संतोष चव्हाण यांनी केली आहे.