जळगाव : मृत्यू कसा होतो हे पाहण्यासाठी मोबाइलमध्ये ‘द डेथ क्लॉक’ ही वेबसाइट खुली केली, त्यात जन्मतारीख टाकून मृत्यू कधी आणि कसा होतो हे पाहिले आणि काही क्षणांतच मोबाइलमध्ये बघितल्याप्रमाणे आठवीतील विद्यार्थी सोन्या दीपक कुंवर (१३, रा. धुरे, जि. धुळे) याने घरातच मंगळवारी बाथरूममध्ये गळफास घेतला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्षल उर्फ सोन्या हा आठवीच्या वर्गात शिक्षण घेत होता. लॉकडाऊन सुरू झाल्याने चार महिन्यांपासून तो तुकारामवाडीतील मामा दीपक भदाणे यांच्याकडे आलेला होता. मंगळवारी ते कामानिमित्ताने घराबाहेर होते. हर्षल व त्याची आजी प्रमिलाबाई हे दोघेच घरी होते. दुपारी दोन वाजेच्या सुमारास आजी कामानिमित्ताने दुकानवर गेली. परत आल्यावर बाथरूममध्ये हर्षल हा साडीने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. नातेवाइकांनी तातडीने त्याला खासगी रुग्णालयात नेले, नंतर तेथून जिल्हा रुग्णालयात हलविले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले.
बालहट्टामुळे घेतलेला मोबाइलच बेतला जीवावरहर्षलच्या पश्चात वडील दीपक कुंवर, आई कविता व बहीण कोमल असा परिवार आहे. वडिलांचा शिंदखेडा येथे कपडे इस्त्री करण्याचा व्यवसाय आहे. हलाखीची परिस्थिती असल्याने हर्षलची आई भाजीपाला विक्री करते. एकुलत्या मुलाच्या हट्टापायी तिने हप्त्यांवर काही दिवसांपूर्वीच १५ हजारांचा मोबाइल खरेदी करून दिला होता. तोच मृत्यूस कारणीभूत ठरला.