दादर पश्चिमेकडील प्रभादेवीतील ओमेगा लग्जोरियन इमारतीमध्ये एक धक्कादायक मारहाणीचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या सीसीटीव्ही फुटेजमुळे हा गुन्हा उघडकीस आला आहे. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन महिला सुरक्षारक्षकांनी एका तरुणीला लिफ्टमध्ये रस्ता अडवून केस पकडून मारहाण केली आहे. याप्रकरणी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात भादंवि ३४१, ३२३, ५०४, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाजी पार्क पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश कसबे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले की, घटना २८ सप्टेंबरला घडली तेव्हा आमच्या पोलिसाने अदखलपात्र गुन्हा दाखल केला. मात्र तक्रारदार महिलेचा लिफ्टमधून रस्ता अडवून तिला घरी जाण्यास दिले नाही आणि धमकावत मारहाण केल्याची गंभीरता पाहता १० नोव्हेंबरला आम्ही दखलपात्र (FIR) गुन्हा दाखल केला.
दादर येथील प्रभादेवीतील ओमेगा लग्जोरियन इमारतीच्या परिसरातील एका 32 वर्षीय तरुणीने सत्या यादव हा सुरक्षारक्षक वाईटनजरेने पाहतो म्हणून सोसायटीकडे तक्रार केली होती. तसेच वडील आणि काकांशी आर के शर्मा सिक्युरिटी सर्व्हिसचा सिक्युरिटी सत्या यादव याने उद्धट वर्तन केले. तरुणीने तक्रार केल्याच्या रागातून दोन महिला सुरक्षारक्षकांनी सोसोयटीमध्ये तक्रार करणाऱ्या तरुणीला लिफ्टमध्ये गाठून तक्रार मागे घेण्यास धमकावले आणि मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
या प्रकरणी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात रजवंत राजपूत त्रिलोकसिंग (४१) व प्रियांका बासुतकर (२७) या दोन महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मारहाणीचे सीसीटीव्ही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. २८ सप्टेंबरला सायंकाळी ६.४५ वाजता कामावरून घरी जात असताना लिफ्टमध्ये अडवून रजवंत आणि प्रियंका या दोघींना तरुणीला अडवले आणि पुन्हा सिक्युरिटीविरुद्ध तक्रार दिल्यास वाईट परिणाम होतील अशी धमकी देऊन घरी जाण्यापासून रोखले. शिवीगाळ करून केस ओढून हाताने आणि लाथाबुक्यांनी मारहाण केली.