नवी मुंबई - रस्त्यावर चाललेले भांडण सोडवायला गेलेल्या दोघांवर माथेफिरूने ऑपरेशनच्या ब्लेडने वार केल्याची घटना घडली आहे. यामध्ये एकाला 32 तर दुसऱ्याला 28 टाके पडले आहेत. तर दोघांवर हल्ला केल्यानंतर माथेफिरूने स्वतःवर देखील वार करून घेतले.सानपाडा सेक्टर 5 येथे रविवारी रात्री भररस्त्यात हा प्रकार घडला. त्याठिकाणी एक मुलगा व महिला रस्त्यात भांडण करत उभे होते. यामुळे जवळच राहणारी एक व्यक्ती त्यांचे भांडण सोडवायला गेले. या गोष्टीचा राग आल्याने महिलेसोबत असलेल्या त्या माथेफिरू तरुणाने स्वतःकडे असलेल्या ऑपरेशन करण्याच्या ब्लेडने वार केले. त्याच्या हल्ल्यातून स्वतःचा बचाव करण्यासाठी व्यक्तीने त्याचा हात पकडण्याचा देखील प्रयत्न केला. यावेळी त्यांच्यात सुरु असलेली झटापट पाहून त्या व्यक्तीच्या परिचयाच्या तरुणाने देखील मदतीला धाव घेतली. त्यामुळे सदर माथेफिरू तरुणाने त्याच्यावर देखील ब्लेडने वार केले. त्यामध्ये जखमी झालेल्या दोघांनी तिथून पळ काढला असता, सदर तरुण व महिलेने सोसायटीच्या गेट पर्यंत त्यांचा पाठलाग करून पुन्हा डोक्यावर व गळ्यावर वार करून तिथून पळ काढला. या घटनेत जखमी झालेल्या दोघांना स्थानिकांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. त्याचवेळी त्या माथेफिरूने स्वतःवर देखील वार करून घेऊन दोघांविरोधात तुर्भे पोलिसांकडे तक्रार केली. मात्र घटनास्थळी उपस्थित नागरिक व सीसीटीव्ही यामुळे संपूर्ण प्रकार उघडकीस आला. त्यानुसार सदर तरुणाविरोधात सानपाडा पोलिसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कृष्णा पांडे (28) असे त्याचे नाव असून तो चेंबूर चा राहणारा आहे. सानपाडा परिसरात तो व त्यासोबतची महिला अमली पदार्थ विक्रीचा धंदा चालवत असल्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. तर घटनेवेळी देखील तो नशेत होता. या नशेत त्याने पोलिसठाण्यात देखील आरडा ओरडा करून प्रत्येकाला धमकावत होता. त्याच्याकडून घडलेल्या या कृत्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. याप्रकरणी तुर्भे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
सानपाड्यातील धक्कादायक घटना; माथेफिरूने दोघांवर केला जीवघेणा हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2019 2:40 PM
दोघांवर हल्ला केल्यानंतर माथेफिरूने स्वतःवर देखील वार करून घेतले.
ठळक मुद्देभांडण सोडवायला गेलेल्या दोघांवर माथेफिरूने ऑपरेशनच्या ब्लेडने वार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी तुर्भे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस अधिक तपास करत आहेत.एकाला 32 तर दुसऱ्याला 28 टाके पडले आहेत.