भोपाळ - मध्य प्रदेशमधील होशंगाबाद जिल्ह्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. किरकोळ वादामधून येथील एका तरुणाचे दोन्ही हात पाच जणांनी तोडले. या प्रकरणातील मुख्य आरोपी हा स्थानिक महिला सरपंचाचा पती आहे. पीडित आणि आरोपींमध्ये जुना वाद आहे. त्याचदरम्यान या तरुणाने सरपंचाच्या पतीची कॉलर पकडली. त्यामुळे संतापलेल्या आरोपींनी या तरुणाचे दोन्ही हात तोडले. ही घटना बाबईमधील चोराहेट गावातील आहे. (shocking incident, Women sarpanch husband chopped man hands in Madhya Pradesh )
मिळालेल्या माहितीनुसार आरोपींनी तरुणाला पूर्वनियोजित कटानुसार अडवले. त्यानंतर त्याला मारहाण करण्यात आली. तसेच तलवारीसारख्या धारदार हत्याराने त्याचे दोन्ही हात कापण्यात आले. जखमी तरुणाला गंभीर अवस्थेमध्ये होशंगाबादमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.
बाबईचे टीआय अशोर बरबडे यांनी सांगितले की, २७ वर्षीय सोमेश चौधरी हा तरुण गावाच्या दिशेने येत होता. त्याचवेळी कालव्याजवळ व्यंकट, केशव, भगवान सिंह, नाती चौधरी आणि मकरंद यांनी त्याला घेरले आणि त्याची दुचाकी अडवली. या पाचही जणांनी सोमेशला मारहाण केली. त्यानंतर धारदार हत्याराने त्याचे दोन्ही हात कापले. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच गावातील लोक घटनास्थळी पोहोचले. जखमी सोमेशला होशंगाबादमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
सोमेश आणि आरोपींमध्ये जुना वाद आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या आधीही त्यांच्यामध्ये वाद झाला होता. त्यामुळे त्यांच्या रोजच वाद उद्भवत असत. शुक्रवारी सकाळी इटारसी येथील धान्याच्या बाजारात सरपंचांचा पती आणि या तरुणामध्ये वाद झाला. यावेळी या तरुणाने सरपंचांच्या पतीची कॉलर पकडली. सर्वांसमोर कॉलर पकडल्याने तो संतप्त झाला. त्याने या तरुणाला धडा शिकवून बदला घेण्याचा निश्चय केला. त्यातून हा हल्ला करण्यात आला.
हा तरुण बाजारातून माघारी येत असताना त्याच्यावर हल्ला करण्यात आला. आरोपींनी त्याला अडवून मारहाण करण्यात आली. तसेच त्याचे दोन्ही हात तोडण्यात आले. हा तरुण कसाबसा घरी पोहोचला. त्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. त्यामुळे त्याचे हात जोडता आले नाहीत.