कल्याण - कल्याणच्या एका महिला वास्तू सल्लागाराच्या कार्यालयात वन्यजीव गुन्हे अन्वेषण शाखा आणि कल्याण वन विभागाने छापा टाकून २५० इंद्रजाल (काळे समुद्री शेवाळ) आणि ८० जोडी घोरपडीचे अवयव जप्त करण्यात आले आहेत. वास्तू सल्लागार गीता जखोटिया यांच्यासह त्यांच्या कार्यालयातील नवनाथ घुगे आणि अक्षय देशमुक या तिघांना ताब्यात घेण्यात आले आह. इतक्या मोठय़ा प्रमाणात या वस्तू वास्तू सल्लागाराच्या कार्यालयात कशा काय आल्या याचा तपास सुरु आहे. (Indrajal & animals organs confiscated from Vastu Consultant's office, three arrested)
कल्याण पश्चिमेतील संतोषी माता रोडवरील मॅक्सी ग्राऊंडसमोर इमारतीत गीता जखोटिया या वास्तू सल्लागार महिलेचे कार्यालय आहे. तिच्या कार्यालयात काही दुर्मिळ वस्तू आणि प्राण्याचे अवयव असल्याची माहिती वनजीव गुन्हे अन्वेषण खात्यास मिळाळी. या माहितीच्या आधारे उपसंचालक योगेश वरकड, गजेंद्र हिरे आणि वन विभागाचे आर. एन. चन्ने यांच्या पथकाने गीताच्या कार्यालयात धाड टाकली. या धाडीत २५० इंद्रजाल अर्थात समुद्री काळे शेवाळ आणि ८० जोडय़ा घरपडीचे अवयव मिळून आले. पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. या तिघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिघांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
इंद्रजाल आणि घोरपडीचे अवयव घरात कार्यालयात दुकानात ठेवल्यास सुखशांती, आरोग्य आणि लक्ष्मी नांदते या अंधश्रद्धेपोटी वस्तू बाळगल्या जातात. तसेच काळी जादू करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. तसेच आयुव्रेदातही त्याचा औषधी वापर केला जातो. त्यामुळे या वस्तू बाळगणो, त्याची विक्री करणो हे वन्य जीव कायद्यान्वये मज्जाव करण्यात आला आहे.