पणजी - हरियाणामधील भाजपा नेत्या आणि सोशल मीडिया स्टार सोनाली फोगाट यांच्या मृत्यूबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. गोवा पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये सोनाली फोगाट यांना जबरदस्तीने ड्रग्स पाजण्यात आल्याची बाब उघड झाली आहे. गोव्याचे आयजी ओमवीर सिंह बिश्नोई यांनी सांगितले की, सोनाली यांच्या पोस्टमार्टेमनंतर आम्ही संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
आयजी ओमवीर सिंह बिश्नोई यांनी सांगितले की, सोनाली फोगाट यांच्या भावाने दिलेल्या तक्रारीनंतर आम्ही हत्येचा गुन्हा दाखल करून घेतला होता. आम्ही सर्वांचे जबाब नोंदवले आहेत. तसेच त्या जिथे गेल्या होत्या. त्या जागांचा दौराही केला आहे. आरोपींना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. चौकशीमध्ये सोनाली फोगाट यांना जबरदस्तीने कुठला ना कुठला पदार्थ पाजण्यात आल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे.
गोवा पोलिसांचे आयजी ओमवीस सिंह यांनी पुढे सांगितले की, सोनाली फोगाट यांना जबरदस्तीने ड्रग्स पाजण्यात आले. त्यानंतर तिची प्रकृती बिघडली. पहाटे ४.३० वाजता जेव्हा ती कंट्रोलमध्ये नव्हती. तेव्हा आरोपी तिला शौचालयात घेऊन गेले. तिथे दोन तास त्यांनी काय केलं? याचं उत्तर आरोपींनी दिलेलं नाही. आम्ही सर्व सीसीटीव्ही फुटेज पाहिले आणि दोन्ही आरोपींनी अटक करण्यात आली आहे.
सोनाली फोगाट यांच्या संशयास्पद मृत्युमागे काही कटकारस्थान असल्याचा संशय पहिल्या दिवसापासूनच येत होता. सोनाली फोगाट यांचे बंधू रिंकू ढाका यांनी गोव्यातील अंजुना पोलीस ठाण्यात तशी तक्रार दिली होती. त्या तक्रारीमध्ये त्याने दोन जणांवर अनेक गंभीर आरोप केले होते. त्याबाबतची माहिती आता पोस्टमार्टेम रिपोर्टमधून समोर येत आहे. त्यामध्ये सोनाली यांच्या शरीरावर अनेक जखमांच्या खुणा असल्याचे दिसून आले होते.