जयपूर : श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याने राजस्थानात खळबळ उडाली आहे. सुखदेव सिंह गोगामेडी हे आपल्या निवासस्थानी असताना तीन हल्लेखोर आले आणि त्यांनी गोगामेडी यांच्यावर गोळ्यांचा वर्षाव केला. या हल्ल्यात गोगामेडी यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या हत्येचे राजस्थानात पडसाद उमटत असून आज राज्यव्यापी बंद पुकारण्यात आला असून समर्थकांकडून आंदोलने सुरू आहेत. अशातच आता राजस्थान पोलिसांचा निष्काळजीपणा चव्हाट्यावर आणणारी माहिती समोर येत आहे.
करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांच्यावर हल्ला होऊ शकतो, अशी माहिती पंजाब पोलिसांनी आठ महिन्यांपूर्वीच राजस्थान पोलिसांना दिली होती. मात्र राजस्थान पोलिसांनी हा इशारा गांभीर्याने घेतला नसल्याचं मंगळवारी घडलेल्या घटनेतून स्पष्ट झालं आहे. त्यामुळे पोलिसांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. याप्रकरणी राजस्थान पोलिसांनी अद्याप खुलासा केला नसून ते नेमकं काय स्पष्टीकरण देतात, हे पाहावं लागेल.
हल्लेखोरांना अटक
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांची त्यांच्याच निवासस्थानी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. तीन मारेकरी लग्नपत्रिका देण्याच्या बहाण्याने त्यांच्या घरी आले होते. सुरुवातीला हल्लेखोरांनी सोफ्यावर बसून त्यांच्याशी गप्पा मारल्या आणि थोड्याच वेळात अचानक त्यांच्यावर गोळीबार केल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आलं. प्रत्युत्तरादाखल गोगामेडी यांच्या अंगरक्षकांनी केलेल्या गोळीबारात एक मारेकरी मारला गेला. तसंच दोन आरोपींनी तिथून पळ काढला.
दरम्यान, सुखदेव सिंह गोगामेडी यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्या दोन आरोपींची ओळख पटली आहे. रोहित राठोड असे एका आरोपीचे नाव असून तो नागौरमधील मकराना येथील रहिवासी आहे. तसंच या प्रकरणातील दुसरा आरोपी नितीन फौजी हा हरियाणातील महेंद्रगडचा रहिवासी आहे.