मुंबई - क्रेडिट कार्डची वैधता संपत असल्याचे सांगून ऑनलाइन ठगांनी व्यावसायिकाची ४० हजार रुपयांना फसवणूक केल्याची घटना अॅण्टॉप हीलमध्ये उघडकीस आली आहे. यात एका लिंकवर गुगल पेद्वारे दोन रुपयांचे पेमेंट केल्यास कार्ड सुरळीत सुरू राहणार असल्याचे सांगून, त्यांच्या खात्यातील रकमेवर हात साफ केला आहे. त्यांच्या तक्रारीवरून अॅण्टॉप हील पोलीस तपास करत आहेत.
अॅण्टॉप हील परिसरात राहणारे अमिताभ राजवंश (४६) यांची यात फसवणूक झाली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, त्यांच्या क्रेडिट कार्डची वैधता संपत असल्यामुळे त्यांना ब्ल्यू डार्ट कुरिअर मार्फत संदेश येत होते. त्यात त्यांना २८ ऑक्टोबर रोजी अनोळखी व्यक्तीने कॉल करून राजवंश यांना पत्ता बदलल्याचे कारण सांगितले आणि गुगल पेवरून २ रुपये भरल्यास कार्ड सुरळीत सुरू राहणार असल्याचे सांगितले. ठगाने त्यांच्या मोबाइलवर लिंक पाठवून याद्वारे पेमेंट करण्यास सांगितले. त्यांनीही विश्वास ठेवून लिंकवर २ रुपयांचा पेमेंट करताच, त्यांच्या खात्यातून ४० हजार काढल्याचा संदेश मोबाइलवर धडकला. त्यांनी संबंधित क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, आरोपी नॉट रिचेबल झाला. यात फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, त्यांनी अॅण्टॉप हील पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.