मुंबई – भारतीय नौदलाच्या जवानाचं चेन्नईवरून अपहरण करून जिवंत जाळल्याची घटना समोर आली आहे. ही घटना पालघर जिल्ह्यात घडली आहे. २७ वर्षीय सुरज कुमार दुबे हा जवान आयएनएस कोयंबटूरच्या लीडरशीप ट्रेनिंग एस्टेबलिस्मेंटमध्ये तैनात होता. गेल्या ६ दिवसांपासून सुरज कुमार बेपत्ता होता, शुक्रवारी संध्याकाळी उशीरा मुंबईतील नाल्यात तो जखमी अवस्थेत सापडला. मात्र नेव्ही हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान शनिवारी रात्री त्याने अखेरचा श्वास घेतला.
माहितीनुसार, नौदलाचा जवान सुरज कुमार दुबे ३० जानेवारीला सुट्टी संपल्यानंतर पुन्हा कामावर रुजू होण्यासाठी कोयंबटूर येथे जात होता, ३० जानेवारीला संध्याकाळी तो रांचीहून प्लेनने हैदराबाद येथे पोहचला. पण हैदराबादमध्ये रात्री तो अचानक बेपत्ता झाला, त्याचे दोन्हीही मोबाईल वारंवार स्विच ऑफ येत होते, यानंतर नातेवाईकांनी याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली, पलामू एसपी यांना जवानाला शोधण्याची विनंती नातेवाईकांनी केली.
पलामू पोलिसांनी हैदराबाद येथील पोलिसांशी संपर्क साधत जवानाला शोधण्यास सुरुवात केली, याचवेळी हा जवान मुंबईत जखमी अवस्थेत आढळून आला. मुंबईलगत असलेल्या पालघर येथे सुरज कुमार दुबे जखमी अवस्थेत सापडला. त्याला पालघरच्या जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले, याठिकाणी डॉक्टरांनी त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं पाहून त्याला नेव्ही हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्याचा सल्ला दिला. परंतु रात्री १ च्या दरम्यान या जवानाने अखेरचा श्वास घेतला.
ज्यावेळी हा जवान जखमी अवस्थेत आढळला तेव्हा तो जळाल्याचं दिसून आलं, जास्त भाजल्याने त्याचा मृत्यू झाला असावा असं डॉक्टरांनी सांगितले, मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरज कुमार दुबेला जाळून नाल्यात फेकून देण्यात आलं होतं, येत्या मे महिन्यात सुरजचं लग्न होणार होतं, सामाजिक कार्यकर्ते विकास दुबे यांनी सांगितले की, नेव्ही जवान सुरजच्या निधनाची माहिती मिळताच गावात शोककळा पसरली, १५ जानेवारीलाच सुरजचा साखरपुडा झाला होता, मे महिन्यात त्याचं लग्न होणार होते, सुरज हा घरात ३ भाऊ-बहिणींमध्ये सर्वात लहान होता, त्याचे वडील शेतकरी आहेत, सुरजचा मृत्यू नेमका कसा झाला? हैदराबादहून मुंबईला येणं, जळालेल्या अवस्थेत एका नाल्यात सापडणं हे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत, सुरजच्या मृत्यूचं रहस्य शोधणं पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे.