पुणे : लॉकडाऊनमध्ये दारुबंदी असल्याने तसेच संचारबंदी असल्याने रस्त्यावरील किरकोळ गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर घट झाली होती. तसेच दारुबंद असल्याने महिलांचा त्रास कमी झाला होता. दारु विक्रीला सुरुवात झाल्यानंतर दारु पिऊन रस्त्यावर गोंधळ घालण्याच्या घटना वाढल्या असून वाहनांची तोडफोडही सुरु झाली आहे. महिलांचा त्रास वाढला आहे. दारु पिऊन येऊन शिवाय सोबत दारुची बाटली पती घेऊन आला़ हे पाहून चिडलेली पत्नी दारुची बाटली ओतून देऊ लागताच पतीने तिच्यावर चाकुने वार केला. ही घटना धानोरी येथील मुंजाबा वस्तीत १९ मे रोजी रात्री साडेआठ वाजता घडली. या घटनेत लिलावती अरुण केंगले (वय ३०, रा. धानोरी) असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी तिचा पती अरुण सीताराम केंगले (वय ३४) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लिलावती व अरुण यांचा काही वर्षांपूर्वी विवाह झाला आहे. त्यांना एक ३ वर्षांची मुलगी आहे. अरुण अम्युनिशन फॅक्टरीमध्ये कामाला आहे. त्याला दारुचे व्यसन आहे. तो मंगळवारी रात्री दारु पिऊन घरी आला. बरोबर त्याने आणखी एक बाटली आणली होती. ती बाटली लिलावती यांनी पाहिली व ती घेऊन ओतून देण्यासाठी स्वयंपाक घरात गेल्या व मोरीमध्ये त्यात बाटली ओतून देऊ लागल्या. हे पाहून चिडलेल्या अरुणने त्यांना ओढत बाहेर घेऊन आला व घरातील भाजी कापायच्या चाकूने त्यांच्या हातावर वार केले. त्यात लिलावती या जखमी झाल्या. त्यांनी उपचार केल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अरुणविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
धक्कादायक ! दारु ओतून देऊ लागलेल्या पत्नीवर चाकूने वार; धानोरीतील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2020 8:30 PM
दारु विक्रीला सुरुवात झाल्यानंतर हिंसाचार, वाहन तोडफोडीच्या घटनांमध्ये वाढ
ठळक मुद्देपतीविरुद्ध गुन्हा दाखल