वणी (यवतमाळ) - पर्यटनाला गेलेल्या आई-वडिलांना मोबाईलवरून व्हिडिओ कॉल करून आत्महत्येची माहिती देत वणीतील कापड व्यावसायिकाने मंगळवारी रात्री लाईव्ह गळफास घेतला. मदत मिळण्याच्याआधीच त्याची प्राणज्योत मालवली. या घटनेने यवतमाळ जिल्ह्यात खळबळ निर्माण झाली आहे.
स्वप्नील मेश्राम (वय ३०) हे दत्तनगर वणी, जि.यवतमाळ येथे राहणारे होते. वरोरा रोडवर त्याचे रेडिमेड कापडाचे दुकान आहे. सोमवारी स्वप्नीलचे आई-वडील पर्यटनासाठी निघाले. मंगळवारी ते पुणे येथे पोहोचले. मंगळवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास त्यांना स्वप्नीलचा व्हिडीओ कॉल आला. मी आता आत्महत्या करणार आहो, हा बघा फास लावलेला आहे, असे म्हणत तो दृश्य दाखवत होता. व्हिडीओ कॉल बघून त्याचे आई-वडील हादरून गेले. त्यांनी शेजारील काही लोकांना तसेच पोलिसांना फोन करून माहिती दिली. घराचा नक्की पत्ता नसल्याने पोलिसांना घर शोधण्यास थोडा विलंब झाला.
पोलीस घरी पोहोचताच, स्वप्नीलने पायाखालचा स्टुल लाथेने सरकविला. मात्र, दार आतून लावून असल्याने पोलीस व शेजारीही स्वप्नीलला वाचवू शकले नाही. अखेर दार तोडून पोलीस स्वप्नीलच्या घरात शिरले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. स्वप्नीलच्या आत्महत्येमागील नेमके कारण स्पष्ट झाले नसले तरी पोलीस विविध पैलूंनी त्याचा तपास करीत आहे. दुकान भाड्याचे आहे का, भाडे किती, दुकानात उलाढाल किती होती, कर्ज तर नाही, कुठे प्रेमप्रकरण आहे का, बँकेच्या व्यवहाराचा काही वाद आहे का अशा विविध मुद्यांवर तपास केला जाणार असल्याचे वणी पोलिसांनी सांगितले.