खोवाई:त्रिपुराच्या खोवाई जिल्ह्यात शनिवारी नैराश्यग्रस्त माथेफिरुने कुऱ्हाडीचे घाव घालून 5 जणांची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हल्ल्यात एका पोलिस निरीक्षकाचाही मृत्यू झालाय. तर, दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. पोलीस अधीक्षक राजीव सेन गुप्ता यांनी सांगितल्यानुसार, शेरतली गावाचा रहिवासी असलेल्या प्रदीप देबरॉय नावाच्या व्यक्तीने आधी त्याच्या दोन अल्पवयीन मुली आणि नंतर लहान भावावर अचानक हल्ला केला, ज्यात ते तिघे जागीच ठार झाले. शिवाय, पत्नीवरही हल्ला करुन गंभीर जखमी केले.
यानंतर देबरॉयने एका ऑटोरिक्षा चालकाला रस्त्यावर थांबवून त्याची हत्या केली, यादरम्यान ऑटोरिक्षा चालकाचा मुलगा गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सत्यजित मलिक यांच्या नेतृत्वाखालील पोलिस पथक घटनास्थळी पोहोचले. यावेळी देबरॉयने पोलीस पथकावरही हल्ला केला.
यात सत्यजित मलिक गंभीर जखमी झाले, त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, गावात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रदीप मागील काही दिवसांपासून नैराष्येत होता. त्याने बऱ्याच दिवसापासून आपल्या घरच्यांनाही बोलणे बंद केले होते.
काल रात्री नेमकं काय घडलं ?शनिवारी मध्यरात्री आरोपी प्रदीप देबरॉय अचानक झोपेतून उठला आणि त्याने घरातील कुऱ्हाडीने आपल्या दोन मुलींना मारायला सुरुवात केली. यादरम्यान त्याने लहान भाऊ आणि पत्नीवरही हल्ला केला. त्यानंतर तो घर सोडून परिसरातील इतर घरांवर हल्ले करू लागला. लोक इतके घाबरले होते की काही वेळ कोणीही घराबाहेर पडले नाही. त्यानंतर सर्वांनी हिंमत एकवटून प्रदीपला हाकलून देण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान प्रदीप वस्तीच्या चौकात आला.
याठिकाणी एक ऑटोरिक्षा येत होती, त्यात बसलेल्या दोघांवर त्याने शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात ऑटो चालक कृष्णा दास यांचा जागीच मृत्यू झाला तर मुलगा करणबीर दास गंभीर जखमी झाला. यानंतर प्रदीपच्या हल्ल्यात पोलीस निरीक्षक सत्यजित मलिक यांनाही जीव गमवावा लागला. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून प्रदीपच्या या रक्तरंजित हिंसक वर्तनामागील कारण शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.