लोकमत न्यूज नेटवर्क छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राध्यापकासह त्याच्या पत्नीच्या विरोधात विद्यार्थिनीच्या लैंगिक छळाचा गुन्हा बेगमपुरा पोलिस ठाण्यात मंगळवारी रात्री नोंदविला. आरोपींमध्ये डॉ. अशोक गुराप्पा बंडगर व त्याची पत्नी पल्लवी अशोक बंडगर (रा. विद्युत कॉलनी) यांचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
विद्यापीठातील एका विभागात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीने दिलेल्या फिर्यादीनुसार, शासकीय कला महाविद्यालयात २०१९ ते २०२१ मध्ये शिक्षण घेताना तृतीय सत्रात सर्व्हिस कोर्ससाठी एका विषयाची निवड केली होती. त्या विषयाची शिकवणी डॉ. बंडगर हा ऑनलाइन घेत होता. तेव्हा पीडितेची त्याच्यासोबत ओळख झाली. त्याने चौथ्या सत्रात लघुप्रबंध सादर करण्यासाठी नोव्हेंबर २०२१ मध्ये पीडितेला मार्गदर्शन केले. पीडितेचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर बंडगरने विद्यापीठातील एका विभागात तिला प्रवेश मिळवून दिला. त्याचवेळी चित्रपटात काम देण्याचेही आमिष दाखवले. पीडितेला वसतिगृहाऐवजी स्वत:च्या घरीच पेइंग गेस्ट म्हणून राहण्यास घेऊन गेला. जून २०२२ मध्ये बंडगरने अनेक वेळा छेडछाड करण्याचा प्रयत्न केला. जुलै २०२२ मध्ये पहाटे हॉलमध्ये पीडिता झोपली असताना बंडगरने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर पाच ते सहा वेळा संंबंध ठेवले. जानेवारी २०२३ मध्ये हा सर्व प्रकार बंडगरच्या पत्नीस पीडितेने सांगितला हाेता.
विद्यापीठाचे पोलिसांत जाण्यासाठी लेखी पत्र एकदा अत्याचाराच्या वेळी पीडिता बेशुद्ध पडली. तिची प्रकृती बिघडल्यामुळे ती गावी गेली. तिला परत येण्यासाठी दाम्पत्याने दबाव टाकला, पण पीडितेने नकार देऊन अखेर सर्व घटनाक्रम वडिलांसह बहिणीला सांगितला. वडिलांनी याविषयी विद्यापीठाकडे तक्रार करण्यास सांगितले. विद्यापीठाने प्राथमिक चौकशी करीत पीडितेला पोलिसांत जाण्याविषयी लेखी पत्र दिले. त्यानंतर पीडितेने बेगमपुरा ठाण्यात तक्रार नोंदवली.