पुणे : ऑटिसिझम (आत्ममग्न)ची शिकार असलेल्या १४ वर्षाच्या मुलीने ३३ वर्षाच्या तरुणीला उचलून इमारतीच्या दुसर्या मजल्यावरुन खाली फेकून दिल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना कोथरुडमधील सावली मतिमंद व बहुविकलांग प्रतिष्ठान या संस्थेत शुक्रवारी दुपारी पावणेपाच वाजता घडला. सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर हा प्रकार समोर आला असून याप्रकरणी कोथरुड पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
ममता मोहन डोंगरे (वय ३३) असे मृत्यू पावलेल्या तरुणीचे नाव आहे. ममता ही गेली २० वर्षे या संस्थेत उपचार घेत आहे. तर १४ वर्षाची मुलगी ही मुळची मुंबईची असून गेल्या १ महिन्यापासून तिला संस्थेत भरती करण्यात आले आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पौड रोडवरील डावी भुसारी कॉलनीमध्ये सावली संस्था १९९४ पासून मतिमंद व बहुविकलांग मुलांवर उपचार करण्यात येतो. सध्या संस्थेत १७ रुग्ण आहेत. या तीन मजली इमारतीत मतिमंद व बहुविकलांग मुलांना वर खाली येता यावे यासाठी जिन्यात पायर्यांऐवजी रॅम्प करण्यात आले आहेत. जेणे करुन ते धरुन चालू शकतील.
ममता ही ३३ वर्षाची असली तरी शरीराने अतिशय बारीक होती.तर आरोपी मुलगी १४ वर्षाची असली तरी ती शरिराने मजबूत आहे. ती अचानक हिंसक होते. संस्थेत असलेल्या बहुतेक मुलांना ऐकायला व बोलायला येत नाही. शुक्रवारी दुपारी ममता दुसर्या मजल्यावरुन पडून जखमी झाली होती. तिला हॉस्पिटलमध्ये नेले असताना तिचा मृत्यू झाला. याची माहिती कोथरुड पोलिसांना मिळाली.
पोलिसांनी तिचे शवविच्छेदन केल्यावर त्यात उंचावरुन पडून मृत्युचे कारण देण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी संस्थेतील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात ममता ही दुसर्या मजल्यावर असणार्या जिन्यातील रॅम्पवर चालत असताना याच संस्थेतील दुसरी १४ वर्षाच्या मुलीने ममता हिला पाठीमागून पकडून तिला उचलून दुसर्या मजल्यावरील जिन्यातून खाली फेकून दिल्याचे त्यात दिसून आले. कोथरुड पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक अमोल घोडके अधिक तपास करीत आहेत.