ठाणे - मखमली तलाव परिसरात राहणाऱ्या एका सोळावर्षीय अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिला मारहाण करीत विनयभंग करणाऱ्या मद्यपी निखिल क्षीरसागर (२६, रा. महावीर कुंज, महात्मा फुले भाजी मार्केट, ठाणे) याला गुरुवारी पहाटेच्या सुमारास नौपाडा पोलिसांनी अटक केली. त्याला २५ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
पीडित मुलगी २० नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास ठाणे मार्केटमधून भाजी घेऊन रस्त्याने पायी जात होती. मखमली तलावाजवळ ती आली असता, निखिलने तिचा पाठलाग केला. मखमली तलाव ते जोंधळी बाग, जुना आग्रा रोड मार्गावर आपला कोणीतरी पाठलाग करीत असल्याचे जाणवल्यानंतर तिने घराच्या दिशेने पळ काढला. तरीही, तिचा पाठलाग करून त्याने तिचा डावा हात पकडून पिरगळला. त्याचवेळी दुसºया हाताने तिला मारहाण करून विनयभंग केला. तिने मदतीसाठी आरडाओरडा केला तेव्हा त्याने पुन्हा तिला मारहाण केली. त्यानंतर रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या रिक्षाच्या पुढील काचेवर तिचे डोके आपटले आणि तिच्या हातांवर नखांनी ओरखडले. या झटापटीने प्रचंड भेदरलेल्या या मुलीने आपल्या पालकांच्या मदतीने नौपाडा पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. त्याच्याविरुद्ध विनयभंग करणे, मारहाण करणे तसेच लहान मुलांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण आदी कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तक्रारीची गांभीर्याने दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले आणि पोलीस निरीक्षक रवींद्र क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली अटक केली.