मुंबई - वाकोला येथील एका बारावीच्या परीक्षा केंद्रात विद्यार्थ्याकडे मोबाइल सापडला़ तो प्रश्नपत्रिकेचे फोटो काढत होता़ पर्यवेक्षकाने त्याला रंगेहाथ पकडले़ पोलिसांत याची तक्रार करण्यात आली. परीक्षा केंद्रात मोबाइल आलाच कसा? याचा तपास पोलीस करीत आहेत़.
इंग्रजीचा पेपर सुरू असताना पटुक टेक्निकल ज्युनियर कॉलेजमध्ये गुरुवारी दुपारी साडेअकराच्या सुमारास हा प्रकार घडला़ पोलिसांनी रात्रशाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर गुन्हा नोंदवत मोबाइल हस्तगत केला. तो पडताळणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविण्यात येईल. परीक्षा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्याने प्रश्नपत्रिकेचे फोटो काढले. त्यामुळे प्रश्नपत्रिका बाहेर कुणाला तरी पाठवून उत्तरे विचारण्याचा त्याचा प्रयत्न असावा, असा पोलिसांना संशय आहे़ पेपर फोडणाºया टोळीशी त्याचा काही संबंध असल्याचे अद्याप समोर आले नाही. सध्या आम्ही चौकशी करीत आहोत, अशी माहिती वाकोला पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलाश आव्हाड यांनी दिली.