मुंबई - कुत्र्याला मारहाण करण्यापासून रोखल्याने आपल्या सख्ख्या भावाची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. विलेपार्ले परिसरात ही अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. कुत्र्याच्या मारहाणीवरून दोन भावांत झालेल्या भांडणादरम्यान आरोपीने आपल्या भावाला धक्का दिला होता. या धक्क्यामुळे खाली जमिनीवर डोकं आपटल्याने डोक्याला जबर मर लागून मृत्यू झाला. शुक्रवारी रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला. वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी आरोपी भावाला अटक केली आहे.
हनुमंता कोळेकर शेजारच्या पाळीव कुत्र्याला मारहाण करत होता. यामुळे त्याचा भाऊ शिवा चिडला होता. त्याने हनुमंताला थांबवण्याचा प्रयत्न केला. यावेळी अत्यंत रागात असलेल्या हनुमंताने शिवाला जोरदार धक्का दिला. त्यानंतर खाली पडला असता शिवाच्या डोक्याला जबर मार लागला आणि बेशुद्ध पडला. बेशुद्ध अवस्थेत शिवाला रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. रुग्णालयाने त्याला मृत घोषित केले. वडील बसुराज यांनी केलेल्या तक्रारीनंतर जुहू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. जुहू पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघेही भाऊ बेरोजगार होते. हुनमंता याला दारुचं व्यसन होतं आणि तो वारंवार कुटुंबीयांशी भांडत असे असं त्याच्या वडिलांनी सांगितलं आहे. हनुमंताची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.