एका महिला पत्रकारालाओला कंपनीच्या कॅबमधून घेऊन जाताना वाहन चालकाने तिच्यासमोर हस्तमैथुन करत अश्लील वर्तन केल्याची घटना बंगळुरूमध्ये घडली आहे. संबंधित महिलेने आरडाओरडा केल्यानंतर वाहन चालक पळून गेला. पोलीस त्या वाहन चालकाचा शोध घेत आहेत.
महिला पत्रकाराच्या तक्रारीनंतर ओला कंपनीने संबंधित ड्रायव्हरला निलंबित केलं आहे. पोलीस तपास सुरू असून हा अनुभव हादरवून टाकणारा असल्याचं या महिला पत्रकाराने आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिलं आहे. ज्या महिला पत्रकारासोबत ही धक्कदायक घटना घडली, त्याबाबत तिने या दुर्दैवी घटनेची माहिती ट्विट करून दिली. तिने आपल्या ट्विटमध्ये 'ज्या शहराला मी माझं घर म्हणते, तिथे आज मला असुरक्षित असल्याचं जाणवलं. काम संपवून मी घरी येत होते, तेव्हा ओला कॅबचा वाहन चालक माझ्या समोरच हस्तमैथुन करत होता. त्याला असं वाटत होतं की, माझं त्याच्याकडे लक्ष नाही. नंतर तो असं भासवू लागला की, तो काही चुकीचं करत नाही. त्याचवेळी मी आरडाओरडा करायला सुरुवात केली. तेव्हा त्याने कॅब थांबवली. माझं दुर्दैव असं की कॅब तेव्हा अंधाऱ्या रस्त्यावर होती. कॅब थांबवल्यावर मी कॅबमधून उतरले आणि वाहन चालकाने पळ काढला. नशीब चांगलं म्हणून मला थोड्या वेळातच दुसरी कॅब मिळाली, असं नमूद केलं आहे.
बेंगळुरू शहराचे पोलीस आयुक्त कमल पंत यांनी या घटनेबद्दल खेद व्यक्त केला आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांची एक पथक पाठवण्यात आले असून आरोपीला लवकरात लवकर अटक केली जाईल, असं पंत यांनी त्या महिला पत्रकाराच्या ट्विटला रिप्लाय देताना सांगितलं आहे. ओला कंपनीने महिला पत्रकाराच्या तक्रारीची दखल घेत तिची माफी मागितली आहे. तसेच संबंधित चालकावर कारवाई करण्यात आल्याची माहिती दिली आहे.