लखनौ - जमीन जुमल्याच्या प्रकरणात, संपत्तीचा ताबा मिळवण्यासाठी आपल्या कुटुंबातील व्यक्तींना मयत घोषित करणारे काही महाभाग तुमच्या माहितीत असतील. पण उत्तर प्रदेशची (Uttar Pradesh) राजधानी असलेल्या लखनौमध्ये त्यापेक्षाही धक्कादायक असा प्रकार समोर आला आहे. येथे एका मंदिराची जमीन हडपण्यासाठी चक्क देवालाच (God) मृत घोषित करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. या महाभागांनी सुरुवातीला देवाला मृत घोषित केले. त्यानंतर कागद दाखवून मंदिराची जमीन हडप केली. आता या प्रकरणाचा तपास झाल्यानंतर या प्रकरणाचे पितळ उघडे पडले आहे. (They declared God dead in Uttar Pradesh )मिळालेल्या माहितीनुसार मंदिराची जमीन भगवान कृष्ण-राम यांच्या नावे होती. मात्र या दोघांनाही मृत घोषित करून त्यांची जमीन सुरुवातीला खोट्या वडलांच्या नावे केली. त्यानंतर पुन्हा ही जमीन अन्य कुणाच्या तरी नावे करण्यात आली. या अफरातफरीबाबत मंदिराच्या विश्वस्तांची तक्रार नायब तहसीलदारांपासून ते जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत करण्यात आली. मात्र तपास सुरू न झाल्याने उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांनी या प्रकरणाचा तपास सुरू करण्याचे आदेश दिले.उत्तर प्रदेशमधील मोहनलालगंज येथील कुशमोरा हलुवापूरमध्ये एका मंदिराच्या ट्रस्टच्या जागेवरून हा संपूर्ण विवाद झाला आहे. ट्रस्टने दाखल केलेल्या अर्जात म्हटले आहे की, मोहनलालगंजमध्ये सर्व्हे नं. १३८, १५९ आणि २१६१ मधील एकूण ०.७३० हेक्टर जमीन कृष्ण-राम यांच्या नावे नोंद आहे.कागदपत्रांमधील नोंदींनुसार हे मंदिर १०० वर्षे जुने आहे. १९८७ मध्ये कृष्ण-राम यांना मृत दाखवून त्यांच्या जागी गयाप्रसाद यांना त्यांचे बनावट वडील म्हणून उभे करण्यात आले. त्यांना कृष्ण-राम यांचे वारस ठरवून ही जमीन त्यांच्या नावावर करण्यात आली होती.हे प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही तर १९९१ मध्ये गयाप्रसाद यांनाही मृत दाखवून त्यांचे भाऊ रामनाथ आणि हरिद्वार यांची नावे नोंद करण्यात आली. अशाप्रकारे मोठ्या प्रमाणावर अफरातफर करून ही जमीन हडप करण्यात आली.