मुंबई - बँकेच्या प्रसाधनगृहात महिला सहकाऱ्याचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ रेकॉर्डिंग केल्याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी गुरुवारी एका २९ वर्षीय पोलीस कॉन्स्टेबलला अटक केली होती. अनिकेत परब असं आरोपीचे नाव असून त्यांच्याविरोधात वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा करण्यात आला. आरोपी हा वरळी पोलीस लाईनमध्ये राहतो. अटक केल्यानंतर अनिकेतचे पोलीस खात्यातून निलंबन करण्यात आले. या अटक पोलिसाला न्यायालयाने जामीन मंजूर केला असल्याची माहिती वांद्रे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयालक्ष्मी हिरेमठ यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
गेल्या आठवड्यात अनिकेत परबला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. नंतर त्याला जामीन मंजूर झाला. आरोपीला वांद्रयातील हिल रोडवरील सरकारी बँकेमध्ये सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले होते. तक्रारदार महिला तीन दिवसांपूर्वीच तिथे आली होती. बुधवारी पावणेपाच वाजताच्या सुमारास कामावर आल्यानंतर तक्रारदार महिला पोलीस कपडे बदलण्यासाठी रेस्ट रुममध्ये गेली. अनिकेत परब तिथे आधीपासूनच होता. तिने त्याला तिथून बाहेर जाण्यास सांगितले.आरोपी बाहेर गेल्यानंतर कपडे बदलत असताना तिथे लपवून ठेवलेल्या मोबाइल फोनवर लक्ष गेले. मोबाईलचा कॅमेरा महिलेच्या दिशेने होता. मोबाईल नजरेस पडू नये यासाठी त्यावर रुमाल घातलेला होता. फोन हातात घेतला तेव्हा व्हिडीओ मोड ऑन होता. तक्रारदार महिला खाली गेली व तिने परबला या कृत्याचा जाब विचारला. तेव्हा त्याने मोबाईल तिच्या हातातून हिसकावून घेतला आणि माझ्या फोनला हात लावण्याची तू हिम्मत कशी केलीस ? असा जाब तिला विचारला.परब नंतर वॉशरुममध्ये पळाला. तिथून बाहेर आल्यानंतर त्याने तिला आपला मोबाईल दाखवला आणि त्यात काहीही रेकॉर्ड केले नाही असा दावा त्याने केला. आरोपीने वॉशरूममध्ये जाऊन व्हिडीओ डिलीट केल्याचा मला संशय आहे. मी माझ्या वरिष्ठांना याबद्दल सांगितले. पोलीस उपायुक्त बँकेत आले. त्यांनी संपूर्ण प्रकरण ऐकून घेतल्यानंतर त्यांनी मला तात्काळ एफआयआर नोंदवण्यास सांगितले अशी माहिती तक्रारदार महिलेने दिली.