श्रीगोंदा (जि. अहमदनगर) : श्रीगोंदा शहरातील भोळे वस्ती परिसरात राहणाऱ्या एका आदिवासी महिलेच्या घरावर सात जणांनी दरोडा टाकला. तलवारीचा धाक दाखवून तिच्यावर शारिरीक अत्याचार करण्याची धमकी दिली आणि चार हजारांचा ऐवज लंपास केला. ही घटना मंगळवारी मध्यरात्री घडली.
जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक आखिलेशकुमार यांनी रात्रीच घटना स्थळास भेट दिली. या घटनेचा छडा लावण्यासाठी आखिलेशकुमार यांनी श्रीगोंद्यात तळ ठोकला आहे.समजलेली अधिक माहिती अशी की, भोळे वस्ती शिवारात राहणाऱ्या एका महिलेच्या घरावर सात अज्ञात दरोडेखोरांनी दरोडा टाकला. या महिलेस तलवारीचा धाक दाखविला. शारिरीक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. एक हजार किमतीचा मोबाईल व तीन हजार किंमतीचे दागिने लंपास केले. पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी तात्काळ या महिलेने दिलेल्या जबाबानुसार फिर्याद दाखल करून घेतली.
जिल्हा पोलीस अधीक्षक आखिलेशकुमार हे या घटनेचे गांभीर्य पाहून रात्रीच श्रीगोंद्यात आले. फिर्यादी महिलेशी चर्चा केली व तपासाची चक्रे वेगाने फिरविण्याचे आदेश दिले. ही घटना नेमकी कशामुळे घडली याची पोलिस याचा शोध घेणार आहेत. सदर महिला जखमी झाली असून तीला ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. चौकशीसाठी तीन जणांना ताब्यात घेतले आहे.