नवी दिल्ली : नैराश्याने ग्रासलेल्या तरुणाने आईची हत्या केली. त्यानंतर तीन दिवस मृतदेहासोबत राहून त्याने स्वत:ही गळफास घेऊन आत्महत्या केली. दिल्लीत बुध विहार भागात रविवारी ही घटना उघडकीस आली. क्षितिज (२५) असे या तरुणाचे नाव असून, तो बेरोजगार होता. त्याने लिहिलेली ७७ पानी सुसाईड नोट सापडली असून, आईची हत्या का केली व नैराश्याविरुद्धचा त्याचा लढा याबाबत त्याने यात सविस्तर लिहिले आहे, असे पोलिसांनी सांगितले.
क्षितिजने गुरुवारी आधी साखळीने आईचा गळा आवळला. त्यानंतर दहा मिनिटांनी तिचा गळा चिरला. गळा आवळून मारलेल्या व्यक्तीच्या आत्म्याला मुक्ती मिळत नाही, असे त्याने कुठेतरी वाचले होते. त्यामुळे नंतर त्याने आईचा गळा चिरला. भगवतगीतेच्या एका अध्यायाचे पठण करून नंतर त्याने आईच्या मृतदेहावर गंगाजल शिंपडले. तीन दिवस तो मृतदेहासोबत राहिला. मृतदेहाला दुर्गंधी सुटल्यानंतर ती बाहेर पसरू नये म्हणून त्याने दुर्गंधीनाशकाचा वापर केला, असे पोलिसांनी सुसाईड नोटच्या हवाल्याने सांगितले.
क्षितिज बेरोजगार होता. त्याच्या वडिलांचे १० वर्षांपूर्वी निधन झाले होते. मी बालपणापासून एकाकी होतो. मला मित्र नव्हते. वडिलांच्या निधनानंतर आई मला पैसे देत नव्हती. आम्हा दोघांनाही एका आजाराने ग्रासले होते, असे सांगत त्याने पित्याविषयी तसेच त्यांच्यासोबतच्या मतभेदांविषयीही लिहिले आहे. त्याच्या आईने खूप सोसले होते व तो तिला मुक्त करू इच्छित होता, असे त्याने म्हटले असल्याचे पोलिसांनी सांगितले.