लोणी काळभोर : दिराच्या घरी जाण्यास नकार दिल्याच्या कारणावरून पतीने घरातील स्टोव्हमधील डिझेल पत्नीच्या अंगावर टाकत तिला पेटवुन देत जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला असल्याची घटना कुंजीरवाडी ( ता.हवेली ) ग्रामपंचायत हद्दीत घडली आहे. पत्नीने समयसूचकता दाखवत पेट घेतलेल्या अवस्थेत शरीरावर पाणी ओतुन घेतल्याने जीव वाचला. मात्र या घटनेत विवाहित महिला गंभीर जखमी झाली आहे. याप्रकरणी पती व दीर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी यशोदा भागवत चौधरी ( वय २५, रा. पेठकरवस्ती, कुंजीरवाडी, ता. हवेली ) या विवाहितेने दिलेल्या फिर्यादी वरून पती भागवत सायप्पा चौधरी व दिर साईनाथ चौधरी ( रा. निगडी, पुणे ) यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ वर्षापुर्वी यशोदा व भागवत यांचे लग्न झाले आहे. २ वर्षांपासुन पती भागवत चौधरी हा दारु पिवुन येवुन तिला शिवीगाळ, मारहाण करत असून तिच्या चारित्र्यावर संशय घेवून शिवीगाळ करत आहे. भांडणे झाली की तिला माहेरहून २ लाख रुपये घेवुन ये,असे म्हणुन वेळोवेळी मारहाण व शिवीगाळ करत असतो. परंतू कौटूंबिक बाब असल्याने तिने याबाबत यापुर्वी तक्रार केली नव्हती. ही बाब तिने आई, वडील व भाऊ यांना सांगितली होती. परंतू आई-वडिलांनी तिला इज्जतीच्या भीतीपोटी व्यवस्थीत नांदण्याबाबत सांगत व पतीला भांडणे न करण्याबाबत समज दिली होती.
मात्र, शुक्रवारी ( दि.२५ ) रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास पती पत्नीला त्याचा भाऊ साईनाथ याच्या घरी चल म्हणाला. यावर तिने तुम्ही एकटे जा मी येत नाही असे सांगितले. याचा राग आल्याने त्याने घरातील स्टोव्ह मधील डिझेल तिच्या अंगावर ओतले व तुला आता जिवंत सोडणार नाही, तुला जाळुन मारुन टाकतो, असे म्हणत पेटवले. त्यानंतर महिला ओरडत घराबाहेर आली व समयसुचकता दाखवत बाहेर ठेवलेले पाण्याचे बादलीतील पाणी डोक्यावरुन घेतले. यामध्ये तिचा डावा खांदा, डोक्याची डावी बाजु व चेह-याची डावी बाजु जळाली आहे. आग विझल्यानंतर पती भागवत हा तेथुन निघुन गेला व जाताना आता तरी थोडे भाजली आहे पुढच्या वेळी जास्त भाजवेल अशी धमकी दिली. दिर साईनाथ यानेही यापूर्वी तिला एकदा जीवे मारण्याची धमकी दिली होती.