सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात बलात्काराचा आरोप केल्यानंतर राज्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे. त्यानंतर काल तक्रारदार महिला रेणू शर्मा हिने आपला जबाब डी. एन नगर पोलीस ठाण्यात एसीपी ज्योत्स्ना रासम यांच्याकडे नोंदवला. त्यानंतर काल अनेक गौप्यस्फोट झाले आणि माजी आमदार कृष्णा हेडगे आणि मनसे नेते मनीष धुरी यांनी रेणूविरोधात आंबोली पोलीस ठाण्यात तक्रार केली. इतकेच नव्हे तर आता रेणूसह तिचा भाऊ बबलू शर्मा आणि बहिण करुणा शर्माविरोधात ब्लॅकमेल करून खंडणी उकळल्याप्रकरणी धनंजय मुंडे यांचे मेहुणे पुरुषोत्तम केंद्रे यांनी नोव्हेंबर २०२० मध्ये तक्रार दाखल केली असल्याची माहिती आता उजेडात येत आहेत.
धनंजय मुंडे बलात्कार प्रकरणाला कालपासून नवनवे खुलासे होत असून वेगळ्या वळणावर हे प्रकरण आले आहे. पुरुषोत्तम केंद्रे यांनी धनंजय मुंडे यांची दुसरी पत्नी करुणा शर्मा, तिची बहीण रेणू शर्मा आणि त्यांचा भाऊ यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. वेगवेगळ्या वेळी अनेकदा त्रास देण्याचा प्रकार घडला. नजीकच्या काळात हे प्रकार वाढतच गेले. रुग्णालयातही त्यांनी त्रास दिला. त्रास सहन होईना म्हणून मी शेवटी तक्रार केली. २०१९ मध्ये धनंजय मुंडे आमदार झाल्यापासून त्यांना ब्लॅकमेल केले जात होते असल्याची माहिती केंद्रे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली.
मी नकार देऊनही रेणू शर्मा यांनी २०१५ पर्यंत मला त्रास देणे सुरुच ठेवले. त्यांनी माझ्यावर पाळतही ठेवली होती. रेणू शर्मा या मला हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याच्या प्रयत्नात होत्या. मात्र, मी त्यांना भेटणे टाळले. मात्र, मी बाहेरून केलेल्या चौकशीत रेणू शर्मा यांनी अशाप्रकारे इतर व्यक्तींना फसवल्याची माहिती मला समजली. मुंबई पोलिसांनी याप्रकरणाची चौकशी करावी, असे कृष्णा हेगडे यांनी पोलिसांना दिलेल्या पत्रात म्हटले होते. विशेष म्हणजे कृष्णा हेगडे यांनी या पत्रामध्ये रेणू शर्मा ज्या फोन नंबरवरुन संपर्क साधायच्या ते क्रमांकही दिले होते. तर मनसेचे नेते मनीष धुरी यांनी रेणू शर्मा यांनी शेरे पंजाब येथील करुणा शर्मा यांच्या फ्लॅटवर नेऊन त्यांच्याशी अश्लील चाळे केल्याचा आरोप केला आहे.