मुंबई - अंधेरी पश्चिमेकडील जुहू गल्ली परिसरात श्वानावर लैंगिक अत्याचार करण्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी उघडकीस आला. याप्रकरणी डी एन नगर पोलिसांनी अहमद शाही नामक इसमाला अटक केली. एका प्राणी संघटनेच्या सदस्याने याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार डी. एन. नगर पोलीस ठाण्यात भादंवि कलम ४२९, ३७७ आणि प्राणी सरंक्षण अधिनियम कलम ११ (१), (अ), ११ (१), (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बाँबे ऍनिमल राईट या प्राण्यांच्या सरंक्षणासाठी काम करणाऱ्या संस्थेच्या माध्यमातून विजय मोहनानी यांनी डी. एन. नगरप पोलीस ठाण्यात धाव घेऊन श्वानावर झालेल्या लैंगिक अत्याचाराविरुद्ध आवाज उठवला आहे. विजय मोहनानी हे या संस्थेचे संस्थापक आहेत. त्यांनी काल रात्री ८. १५ वाजताच्या सुमारास याप्रकरणी तक्रार दिली. विजय यांना जुहू गल्ली येथून अस्लम शेख नावाच्या व्यक्तीचा कॉल आला. त्याने जुहू गल्लीतील कुत्र्यासोबत अश्लील वर्तन केल्याची माहिती दिली. त्यावर विजय यांनी अस्लमकडे पुरावा मागितला असता त्याने व्हिडीओ पाठवला. त्यानंतर विजय यांनी अस्लमला अधिक माहिती विचारली असता तो व्हिडीओ डिसेम्बर २०२० मध्ये काढला असल्याचे त्याने सांगितले. हे दुष्कृत्य करणारा इसम अहमद शाही हा आमच्या ओळखीचा असून हा धक्कादायक प्रकार पुन्हा घडू नये म्हणून माहिती दिल्याचे अस्लम यांनी विजयला सांगितले. त्यावरून विजय यांनी गुन्हा दाखल केली आणि पोलिसांनी अहमद शाहीला अटक केली आहे.
अहमद शाही हा जुहू गल्ली परिसरातील श्वानांशी लगट करून त्यांचे लैंगिक शोषण करत असल्याचे समोर आले. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर विजय मोहनानी यांनी तात्काळ डी. एन. नगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.