मुंबई - कुलाबा परिसरातील बिअर बारमध्ये अश्लील चाळे केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी महापालिका उपायुक्तासह सहा जणांना ताब्यात घेतलं आहे. प्लॅटिनम या बिअर बारवर टाकलेल्या धाडीतपोलिसांनी १५ जणांना ताब्यात घेतलं होतं. त्यात हे सात जण सापडल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांनी बिअर बारला टाळं ठोकलं असून चार बारबालांची सुटका करण्यात आली आहे.
कुलाबा परिसरातील प्लॅटिनम बिअर बार हा बारसाठी असलेल्या वेळेच्या मर्यादेहून अधिक काळ सुरू असतो. तसेच इथे काही बेकायदेशीर कृत्य देखील होत असल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे बुधवारी पोलिसांनी बारवर धाड टाकली. तेव्हा तिथे ऑर्केस्ट्रा सुरू असल्याचं पोलिसांना आढळून आलं. रात्री सव्वा बाराच्या सुमाराला बार बंद करण्याचं सोडून कर्मचारी ग्राहकांना दारू पाजत होते. त्याचप्रमाणे ऑर्केस्ट्राच्या तालावर काही बारबाला नृत्यही करत होत्या. त्यातील काही जणींचे हावभाव हे अश्लील होते. तिथे आलेल्या ग्राहकांपैकी काहीजण बारबालांवर पैसे उथळण्यात तर काही जण त्यांच्यासोबत अश्लील चाळे करत असल्याचे पोलिसांना दिसून आले. पोलिसांनी मोबाईलमध्ये या सगळ्या प्रकाराचं शूटिंग केलं आणि बारवर धाड घातली आहे. या धाडीत पोलिसांनी ज्या १५ जणांना ताब्यात घेतलं त्यात ९ बार कर्मचारी तर ६ ग्राहकांचा समावेश आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ग्राहकांपैकी एक जण तर महापालिका उपायुक्त असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे असे वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिले आहे. पालिके अधिकारी असून देखील बारबालांसोबत अश्लील चाळे केल्याप्रकरणी त्यालाही ताब्यात घेण्यात आलं आहे. याशिवाय चार जण व्यावसायिक तर एक जण वरिष्ठ सरकारी कर्मचारी असल्याचं स्पष्ट झालं आहे.