भिवंडी : लांबच्या नात्यातील चुलत बहिणीसोबत सुरू असलेल्या प्रेम प्रकरणाला विरोध करणे सख्या जन्मदात्या आईच्या जीवावर बेतले. पोटच्या मुलाने प्रियसीच्या मदतीने आईचा गळा आवळून हत्या केल्याची घटना काल्हेर येथे मंगळवारी घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अमरावती अंबिकप्रसाद यादव (वय ५८) असे मयत मातेचे नाव असून कृष्णा अंबिकप्रसाद यादव (वय २९) व बबिता पलटूराम यादव (वय ३०) असे हत्या केलेल्या मुलाचे व त्याच्या चुलत बहिणीचे नाव आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी काल्हेर येथील मैत्री कॉम्प्लेक्स येथे अमरावती यादव या पती व दोन मुलांसह राहत होत्या. त्यांच्या घरी बबिता ही पती सोबत फारकत घेऊन आलेली. लांबच्या नात्यातील पुतणी देखील राहण्यास आली होती. दरम्यानच्या काळात मुलगा कृष्णा व बबिता यांच्यात प्रेम संबंध जुळले. मात्र घरात राहणारी मुलगी नातेवाईक असल्याने आईने त्यांच्या प्रेमसंबंधांना विरोध केला. याचा राग मनात ठेवून कृष्णाने बबितासोबत जन्मदात्या आईची बेडरूम मध्ये पट्ट्याने गळा आवळून हत्या केली.
आरोपी कृष्णा याने स्वतः पोलिसांच्या १०० क्रमांकावर फोन करून आपल्या आईची हत्या झाल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षास कळविली. या घटनेची माहिती कळताच सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशांत ढोले, नारपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शना खाली सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन पाटील,सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत आवारे,पोलीस निरीक्षक रोहन शेलार, महिला पोलीस नाईक पठाडे, पोलीस हवालदार नवले, क्षीरसागर, चव्हाण, भगवान चव्हाण हे पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहचले.
दरम्यान, कृष्णा याने इमारतीच्या गेट जवळ आपला काही मित्रांसोबत वाद झाला असता त्यात हाणामारी झाली. हे माझ्या आईने पहिले असता तिने इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारून मला वाचविण्याचा प्रयत्न केला.मारहाण करणाऱ्यांनी माझ्या डोक्यात काहीतरी मारल्याने मी बेशुद्ध झालो तर या मारहाणीत आईला मार लागल्याने आई देखील मरण पावली असा बनाव आरोपी कृष्णाने पोलिसांसमोर रचला.
कृष्णाच्या बोलण्यावर पोलिसांना संशय आल्यानंतर पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याने स्वतःच हत्या बबिताच्या मदतीने केल्याची कबुली पोलिसांना दिली.त्यांनतर नारपोली पोलिसांनी कृष्णा यादव व त्याची नातेवाईक चुलत बहीण बबिता यादव यांच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करीत दोघांनाही अटक केली आहे.या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक संभाजी जाधव हे करीत आहेत.