श्रीनगर : दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यामध्ये रविवारी सुरक्षादले आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. त्रालच्या गुलशनपोरामध्ये झालेल्या या चकमकीत हिज्बुल मुजाहिद्दीन आणि जैशशी संबंधीत तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. तर दुसरीकडे श्रीनगर विमानतळावर धक्कादायक प्रकार घडला आहे.
श्रीनगर विमानतळावर एका पोलिस अधिकाऱ्याला अटक करण्यात आली. हा अधिकारी त्याच्या कारमधून दोन दहशतवाद्यांना घेऊन जात असल्याने त्याला ताब्य़ात घेण्यात आले. पुलवामातील चकमकीत जवानांकडून शोधमोहिम राबविण्यात आली होती. यावेळी दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. यामध्ये तीन दहशतवादी ठार झाले. या चकमकीनंतर लष्कराने शोधमोहिम तीव्र केली आहे.
काश्मीरचे आयजीपी विजय कुमार यांनी सांगितले की, श्रीनगर विमानतळावर स्ट्रॅटेजिक एंटी हायजॅकिंग टीममध्ये तैनात असलेला अधिकारी देविंदर सिंह याला अटक करण्यात आली आहे. तो त्याच्या कारमधून दोन दहशतवाद्यांना घाटीमध्ये नेत होता. त्याच्यासोबत दहशतवाद्यांसारखीच वागणूक दिली जाणार आहे. त्याने गंभीर गुन्हा केला आहे. या गुन्ह्याबाबत शनिवारपर्यंत कोणाला माहिती नव्हती. यामुळे त्याला ड्यूटीवरून हटविता आले नाही. आज गुन्हा उघड झाल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.