ढाका – बांग्लादेशी अभिनेत्री राइमा इस्लाम शिमू हिचा मृतदेह सोमवारी सकाळी एका पोत्यात बंद केलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ माजली. शिमूचा मृतदेह केरानीगंजमध्ये हजरतपूर ब्रिजजवळ सापडला. रायमाचा मृतदेह रस्त्याशेजारी बेवारस अवस्थेत फेकल्याचं दिसून आलं. या घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी रवाना झाले. ३५ वर्षीय अभिनेत्रीच्या गळ्यावर काही संशयास्पद निशाण आढळले आहेत. त्यामुळे कुणीतरी अभिनेत्रीची हत्या केल्याचा संशय बळावला आहे. पोलीस सध्या या प्रकरणाची चौकशी करत आहेत.
शुटींगसाठी घरातून निघाली, ती परतलीच नाही
रायमा बांग्लादेशची राजधानी ढाका ग्रीन रोड परिसरात तिच्या पती आणि २ लहान मुलांसोबत राहते. रविवारी सकाळी ती मावा येथे शुटींग करण्यासाठी घरातून बाहेर पडली. त्यानंतर अनेकदा तिला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु तिचा काहीही शोध लागला नाही. आई शुटींगमध्ये बिझी असावी असं मुलांना वाटलं. परंतु संध्याकाळ झाली तरी अभिनेत्री घरी परतलीच नाही तेव्हा कुटुंबीयांनी पोलीस स्टेशनला धाव घेत तक्रार नोंदवली.
रायमच्या मृतदेहाचे २ तुकडे हजरतपूर ब्रिजजवळ रस्त्याशेजारी जप्त करण्यात आले. त्यानंतर मृतदेह पोस्टमोर्टमसाठी हॉस्पिटलला घेऊन जाण्यात आला. शिमूचा भाऊ इस्लाम खोकॉनने पती सखावत अमीन नोबेलविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. ढाका जिल्हा पोलीस मारुफ हुसैन सरदार म्हणाले की, पती आणि फरहादसह ६ लोकांना शिमूच्या संशयास्पद हत्येसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. त्यासोबत एक कार जप्त केली आहे. ज्याच्या मागच्या सीटवर रक्ताचे डाग आढळले आहेत.
अभिनेता जायद खानदेखील खोकॉनसोबत पोलीस ठाण्यात पोहचला होता. सूत्रांच्या माहितीनुसार, शिमू बांग्लादेश फिल्म आर्टिस्ट असोसिएशनच्या सदस्यतेवरुन जायद खानसोबत वाद सुरु होते. परंतु खानने या आरोपांना नकार देत मागील २ वर्षापासून शिमूशी फोनवर बोललो नाही असा दावा केला आहे. शिमूने तिच्या करिअरची सुरुवात प्रेजेंटपासून केली होती. त्यानंतर देलवर, जहाँ झंतु, चाशी नजरुल इस्लाम या सिनेमात काम केले. १९९६ ते २००४ या काळात शिमूने २५ सिनेमे केले. ५० पेक्षा अधिक नाटकांमध्ये शिमूने काम केले आहे.