बंगळुरू - कर्नाटकात एक निर्घृण हत्येच्या प्रकार समोर आला. एका व्यक्तीने आधी आपल्या मित्राची हत्या केली आणि नंतर त्याचा शिरच्छेद करून त्याचे शिर घेऊन गावभर फिरला. नंतर मित्राचे शीर हातात घेऊन तो थेट पोलीस ठाण्यात हजर झाला. हत्या करणारी व्यक्तीच शिर हातात घेऊन पोलीस स्थानकात आल्याने पोलिसही हादरले होते. या हत्येचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर वायरल होत आहे. वायरल व्हिडीओमध्ये एक व्यक्ती आपल्या मित्राचे मुंडके हातात घेऊन चालताना दिसत आहे. स्थानिक प्रसारमाधमांनी दिलेल्या वृत्तानुसार, या व्यक्तीचे नाव पशुपती असून पशुपतीने आधी आपला मित्र गिरीशची निर्घृण हत्या केली आणि त्यानंतर सकाळी हातात शिर घेऊन गाव हिंडून नंतर पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी आरोपीला अटक केली.
गिरीश आणि पशुपती चांगले मित्र असल्याचे स्पष्ट झाले आहे. दोघेही चिकाबगिलू या गावात राहात होते. गेल्या शनिवारी दोघांमध्ये काही कारणावरून वाद झाला. यानंतर हा वाद एवढा वाढत गेला की पशुपतीने गिरीशची गळा चिरून हत्या केली. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.