चेन्नई - तामिळनाडूपोलिसांनी एका अशा आरोपीला अटक केली आहे. या आरोपीचं नाव एम. मुरुगन असं आहे. त्याने गेल्या दहा वर्षात अनेक महिलांना लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्याकडील सोने लुबाडले आहे. जवळपास ३० महिलांना गंडा या ५९ वर्षाच्या म्हाताऱ्याने घातला होता. तामिळ वृत्तपत्रात लग्नाची बोगस जाहिरात देऊन तो महिलांना आपल्या जाळ्यात ओढत असल्याचे पोलिसांनी माहिती दिली.
बुर्मा कॉलनी येथे राहणाऱ्या मुरुगनच्या विरोधात होसूर येथे राहणाऱ्या एका महिलेने फसवणुकीची तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी त्याला अटक केली आहे. तामिळनाडू पोलिसांनी मुरुगनकडून ३० हजार रुपये आणि सोनं देखील हस्तगत केले आहे. २००८ पासून मुरुगन हा एका तामिळ वृत्तपत्रात तो घटस्फोटित असून कोणत्याही जाती धर्माची महिला लग्नासाठी पाहिजे असल्याची जाहिरात देत होता. व्यावसायिक असून महिन्याचे उत्पन्न ४० ते ५० हजार असल्याचे त्याने जाहिरातीत नमूद केले होते. जाहिरात पाहून महिला मुरुगनला कॉल करत. त्यानंतर मुरुगन ज्या ठिकाणी सीसीटीव्ही नाहीत अशी ठिकाण हेरून संपर्क केलेल्या महिलांना भेटायला बोलवत असे. नंतर हळूहळू ओळख वाढली की त्यांना लग्नाचं आमिष दाखवून बतावणी करून महिलांकडे सोन्याचे दागिन्यांची मागणी करत असे. अशाप्रकारेच मुरुगनने होसूर येथील महिलेला भेटण्यास बोलावले. नंतर तिच्या गळ्यातील सोनसाखळी त्याने मागितली आणि तिने दिली. काही दिवसांनी तिने मुरुगन कॉल केला असता त्याचा कॉल लागला नाही. त्यावेळी तिची फसवणूक झाली असल्याचं उघड झाल्याने तिने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी मुरगनला बेड्या ठोकल्या. मुरुगन वारंवार सिमकार्ड बदलत असे आणि महिलांशी संपर्क तोडत असे. जास्तीत जास्त घटस्फोटित महिलाच या भामट्याच्या जाळ्यात अडकल्या आहेत. त्याच्याजवळून ५० सिमकार्ड पोलिसांनी हस्तगत केली आहेत.