लातूर : पहिली मुलगी असताना दुसरीही मुलगी झाली, म्हणून एका प्राथमिक आराेग्य केंद्रात प्रसूती झालेल्या २५ वर्षीय आईनेच आपल्या तीन दिवसांच्या मुलीचा गळा दाबून खून केल्याचा धक्कादायक प्रकार लातूर तालुक्यात घडला. या घटनेने एकच खळबळ उडाली असून, याबाबत गातेगाव पाेलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांनी सांगितले की, उस्मानाबाद जिल्ह्यातील हाेळी (ता. लाेहारा) येथील रेखा किसन चव्हाण ही महिला सध्या लातूर तालुक्यातील एका वस्तीवर वास्तव्याला आहे. ती दुसऱ्यांदा गराेदर राहिली हाेती. तिला पहिली मुलगी असून, ती काटगाव वसंतनगर तांडा येथे २७ डिसेंबर राेजीं नजीकच्या कासार जवळा येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात प्रसुतीसाठी दाखल झाली. दरम्यान, आराेग्य केंद्रात तिने गाेंडस मुलीला जन्म दिला. दुसऱ्यावेळीही मुलगी झाल्याने रेखा चव्हाण नाराज हाेती. त्याच रागातून तिने २९ डिसेंबर २०२२ राेजी रुमालाने तीन दिवसाच्या चिमुरडीचा गळा दाबून खून केला. गातेगाव पाेलिसांनी केलेल्या तपासात महिलेनेच बाळाचा खून केल्याचे उघड झाले आहे. याबाबत गातेगाव पाेलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पाेलिसांनी आईला अटक केली आहे.
नकाेशीचा गळा दाबून खून... -पहिली मुलगी झाल्यानंतर चव्हाण दाम्पत्याने पुन्हा मुलासाठी प्रयत्न केला हाेता. मात्र, दुसऱ्यावेळीही मुलगीच झाली. मुलगी नकाे असल्याने मातेनेच प्राथमिक आराेग्य केंद्रात तीन दिवसानंतर रुमालाने बाळाचा गळा दाबून खून केल्याचे तपासामध्ये समाेर आले आहे, असे पाेलीस उपनिरीक्षक किशाेर कांबळे यांनी सांगितले.