हरयाणाच्या पलवल येथे पोलीस कर्मचाऱ्यांनी सरकारला ३ कोटी पेक्षा जास्त रुपयांना गंडा लावला. संबंधित जिल्हा एसपी अधिकाऱ्याने मे महिन्यात करण्यात आलेल्या चालानचे रेकॉर्ड मागितले. मात्र, मे महिन्यात रेकॉर्डवर आलेली रक्कम आणि बँकेत जमा रक्कम यामध्ये मोठी तफावत जाणवत होती. त्यामुळे, एसपी लोकेंद्र सिंह यांनी तपासाचे आदेश दिले. त्यानंतर, तपास केला असता सव्वा ३ कोटी रुपयांचा घोटाळा असल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी एका पोलीस हवालदारास अटक करण्यात आली आहे.
डीएसपी ट्रॅफिक संदीप भोर यांनी सांगितले की, पलवल एसपी लोकेंद्र सिंह यांच्या लक्षात आले होते की, ई-चालानद्वारे दंड स्वरुपातील रक्कम आणि बँकेत जमा करण्यात आलेल्या रकमेत मोठी तफावत आहे. त्यामुळे, त्यांनी चौकशीचे आदेश दिले होते. याप्रकरणी कसून तपास केला असता, पोलिसांना धक्कादायक माहिती समोर आली. या तपासात जमा आणि बँकेतील रकमेत मोठी तफावत असलेले आकडे समोर आले. चालान ब्रांचमध्ये तैनात पोलीस कर्मचारीच सरकारी पैशाची लुबाडणूक करत असल्याचे लक्षात आले. गेल्या काही वर्षांपासून हे कर्मचारी सरकारी पैसे बँकेतील खात्यात न जमा करता स्वत:च्या खर्चासाठी वापरत होते.
पोलिसांना चौकशीत आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे. चालान विंडोवर तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी तब्बल ३ कोटी ३३ लाख ९७ हजार रुपयांची रक्कम गायब केल्याचं उघडकीस आलं आहे. याशिवाय, जून २०२० मध्ये विविध ठाण्यातील पोलीस चौक्यांच्या ई-चालान मिशनद्वारे घेण्यात आलेला दंड १,३८,५०० रुपयेही बँकेत जमा केला नाही. तसेच, ऑक्टोबर महिन्यात १,३९,००० रुपये कुठल्याच खात्यात जमा केले नाहीत. तर, पावत्यांचा मेळ लागला नाही. त्यावरुन, या पोलिसांनी बनावट पावती पुस्तके बनवल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, यावेळी प्रधान शिपाई जनक हे ब्रांचमध्ये तैनात होते. त्यामुळे, त्यांची चौकशी करण्यात येत आहे.
डीएसपी मोर यांनी सांगितले की, दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांनी नियम माहिती असतानाही आपल्या पदाचा गैरवापर केला. तसेच, सरकारी पैसे सरकारी खात्यात जमा न करत स्वत:च्या कामासाठी खर्ची केले. त्यामुळे, जनक व ओमबीर या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून एकास अटकही करण्यात आली आहे.