नवी दिल्ली - नोएडा येथे राहणारे सॉफ्टवेअर कंपनीत मार्केटिंग अधिकाऱ्याच्या कारसमोर वाहतूक पोलिसाने येऊन दांडा मारला आणि नेमकं त्याचवेळी त्याला हार्ट अॅटॅक आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मदत करण्याऐवजी घटनास्थळाहून वाहतूक पोलिसाने पळ काढला.
या घटनेवेळी मार्केटिंग अधिकाऱ्यासोबत त्याचे वयोवृद्ध आई - वडील देखील कारमधून प्रवास करत होते. आई - वडिलांनी मुलाला हार्ट अटॅक आल्यानंतर रस्त्यावरील लोकांच्या मदतीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं. मृत युवकाचे नाव गौरव (३४) असं असून ते गुडगांव येथील सॉफ्टवेअर कंपनीत मार्केटिंग विभागात अधिकारी पदावर कार्यरत होते. या घटनेने मृत इसमाच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. वयोवृद्ध आई - वडिलांनी पंतप्रधान आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्याकडे घडलेल्या घटनेबाबत न्याय मागण्यासाठी धाव घेतली आहे.
मृत गौरवचे कुटुंब नोएडा येथील सेक्टर ५२ मधील शताब्दी विहारमध्ये राहते. वडील मुलचंद शर्मा यांनी नोकरीतून निवृत्ती घेतली असून रविवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास गौरव आई - वडिलांसह कारने इंदिरापुरममध्ये राहणाऱ्या नातेवाईकांकडे जाताना हा दुर्दैवी प्रकार घडला. मात्र, नोएडा पोलीस आणि गाजियाबाद पोलीस ही घटना नेमकी कोणत्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली या वादात फसले आहेत. नोएडाचे एसएसपी वैभव कृष्ण यांनी दिलेल्या माहितीनुसार मृत गौरव यांना मधुमेह होता असून ही घटना सीआयएसएफ कटजवळ घडली आहे. त्यामुळे गाजियाबाद पोलीस याबाबत माहिती कळविण्यात आली आहे. तर गाजियाबादचे ट्राफिक एसपी श्याम नारायण सिंह यांनी सांगितले की, सेक्टर ६२ नजीक रविवारी सायंकाळी तैनात पोलीस कर्मचाऱ्यांना विचारणा करण्यात आली. मात्र, त्यांच्याकडून अशाप्रकारच्या घटनेची माहिती प्राप्त झाली नसल्याचे त्यांनी सांगितले.