मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. कोरोनाचा अटकाव घालण्यासाठी संपूर्ण देश प्रयत्नशील आहे. आपल्या देशात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. यात लोकांना जीवनाश्यक गोष्टी वगळता इतर कामांसाठी घराबाहेर पडू नये असं आवाहनकरूनही मुंबईतील डोंगरी येथे धक्कादायक प्रकार घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लॉकडाऊन असतानाही रस्त्यांवर गाड्या काढून फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांकडून वाडीबंदर येथील पी. डिमेलो रोडवर नाकाबंदी लावण्यात आली होती. दरम्यान आज सकाळी ८. १० वाजताच्या सुमारास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजेंद्र विष्णू धुरत (४०) हे नाकाबंदीच्या ठिकाणी तैनात होते. यावेळी तिथून जाणाऱ्या दुचाकीस्वाराला त्यांनी रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र दुचाकीस्वाराने न थांबता पळून जाण्याच प्रयत्न केलाच तसेच धुरत यांना दुचाकीस्वाराने फरफटत नेले.
याप्रकरणी डोंगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज सकाळी ८. १० वाजताच्या सुमारास धुरत हे पूर्व मुक्त मार्ग, पी.डीमेलो मार्ग, वाडी बंदर, दक्षिण वाहिनी, डोंगरी, मुंबई या ठिकाणी संचारबंदी काळात नाकाबंदी करीत असताना यातील ४० वर्षीय अटक आरोपीस थांबण्याचा इशारा आणि मौखिक आदेश दिले असताना देखील त्याने त्याच्या ताब्यातील मोटर सायकल क्र. MH 01 DG 2448 ही भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून पोलीस अधिकारी धुरत यांना धडक देऊन त्यांना दुखापत करून फरफटत नेले. त्यामुळे शासकीय कामात अडथळा निर्माण केला आणि पोलीस अधिकाऱ्यास दुखापत केली म्हणून भा. दं. वि. कलम 353, 332, 279, 336, 337, 188, 271 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपी दुचाकीस्वारास अटक करण्यात आली असून त्यास न्यायालयाने १० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.