मुंबई - घाटकोपर पूर्व येथील कामराज नगर विभागात पहाटे एकाच कुटुंबातील दोन चिमुरड्यांचा मृत्यू झाला आहे. नंदिनी इंदर यादव ही साडे तीन वर्षाची मुलगी तर किशोर यादव हा साडेचार वर्षाचा मुलाचा मृत्यू झाला आहे. तसेच रोहित या 12 वर्षाचा आणि कृष्ण हा 8 वर्षाचा मुलगा राजावाडी रुग्णालयात उपचार घेत आहे. आज मध्यरात्री 3 वाजताच्या दरम्यान पहिल्यांदा नंदिनीला रुग्णालयात आणले होते. तेव्हा तिला डॉक्टर यांनी दाखलपूर्व मृत घोषित केले. तर सकाळी 8 वाजता किशोरला राजवाडीत दाखल केले. त्यावेळी त्याच्यावर उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. या दोन चिमुकल्यांचा मृत्यू अन्नामधून विषबाधा झाल्याने झाले असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तर यादव याची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. त्यामुळे काळ दिवसभरात जेवणाच्या वेळेस चहा आणि पाव घरातील सर्व सदस्यांनी खाल्ला होता. त्यामुळे हा भूकबळीचा प्रकार तर नाही ना तसेच दोघे आजारी असल्याचे सांगत शवविच्छेदन झाल्यावरच मृत्यूचे कारण निश्चित करता येईल असे पंत नगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक रोहिणी काळे यांनी 'लोकमत'शी सांगितले. तसेच त्या पुढे म्हणाल्या नंदन या मुलीला थंडी वाजून ताप येत होता तर किशोरला आकडी मिरगीचा त्रास होत होता. अन्य दोघांची प्रकृती स्थिर असून त्यांना उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. दोघांच्या मृत्यूप्रकरणी पंत नगर पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नंदिनीला आई स्तनपान करत असताना ती गुदमरली आणि दरम्यान तिला थंडी आणि ताप देखील होती. तसेच किशोरला देखील एक - दोन दिवसांपासून थंडी, ताप होता आणि त्यातच त्याला आकडी आल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. दोन लहान मुलांचा मृत्यू झाल्याने भयभीत झालेल्या आई - वडिलांनी इतर दोन मुलांना देखील घाबरून रुग्णालयात दाखल केले.
धक्कादायक...एकाच घरातील दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू
By पूनम अपराज | Published: September 25, 2018 4:00 PM