काळे झेंडे दाखविणाऱ्या शेतकऱ्यांवर केंद्रीय गृह राज्य मंत्र्यांच्या मुलाने कार चढविल्याने काही जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. यामुळे संतापलेल्या आंदोलकांनी दोन गाड्यांची जाळपोळ केली आहे. यामध्ये एक पत्रकार देखील जखमी झाला आहे. (uttar pradesh lakhimpur kheri car driver allegedly ran over car on farmers)
उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खीरीचे खासदार आणि गृह राज्य मंत्री अजय मिश्र टेनी यांचा मुलगा मोनू मिश्रा याने शेतकऱ्यांवर गाडी चढविल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. उप मुख्यमंत्री केशव मोर्य यांना काळे झेंडे दाखविण्यासाठी शेतकरी तिकोनिया येथे जमले होते. त्यांच्यावर गाडी आदळण्यात आली आहे.
अजय मिश्र टेनी यांच्या मूळ गावी आज उपमुख्यमंत्र्यांची सभा होती. तेथे ते उपमुख्यमंत्री जाणार होते. त्या आधीच आंदोलक शेतकरी आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. यानंतर झालेल्या हाणामारीत काही शेतकरी जखमी झाले आहेत. तर मोनू मिश्राने या शेतकऱ्यांवर गाडी चालविल्याचे सांगितले जात आहे. यामुळे शेतकऱ्यांनी मोनूच्या दोन ते तीन गाड्या पेटवून दिल्या आहेत. यामुळे घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर पोलीस तैनात करण्यात आले आहेत. उप मुख्यमंत्री केशव मोर्य यांचा होणारा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.