मुंबई - संपूर्ण देश हैदराबाद सामूहिक बलात्कार आणि हत्या तसेच उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणाने हादरून गेला असताना मुंबईत ८ डिसेंबरला अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. चालत्या कारमध्ये २२ वर्षीय तरुणावर तिघांना अनैसर्गिक अत्याचार केला आणि त्याच्याजवळील पैसे काढून घेऊन त्याला मारहाण केली. तसेच पळ काढत आरोपींनी पीडित तरुणाला गाडीबाहेर रस्त्यावर ढकलून दिले. याबाबत व्ही. बी. नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून २४ तासांत पोलिसांनी मेहुल परमार (२१), असिफ अली अन्सारी (२३) आणि पियुष चौहान (२२) या तिघांना अटक केली आहे. या त्रिकुटाला १६ डिसेंबरपर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
८ डिसेंबरला रात्री ११.३० वाजताच्या सुमारास २२ वर्षीय तरुण कुर्ला पश्चिम येथील नवाब शीख पराठा येथे शीख कबाब खाण्यासाठी थांबला होता. त्यावेळी एका स्कुटीवरून दोन इसम आले आणि त्यांनी पीडित २२ वर्षीय तरुणाला आम्ही तुला इंस्टाग्रामी या सोशल मीडियाद्वारे ओळखत असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याला सोबत येण्याची विनंती केली. २२ वर्षीय तरुण त्यांच्या स्कुटीवर दोघांच्या मध्ये बसला आणि तिघेही निघाले. ते श्रद्धा जंक्शनमार्गे होलीस्पिरीट शाळेकडून विद्याविहारकडे निघाले असता २२ वर्षीय तरुणाने गाडीवरून उतरण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र, दोघांनी उतरू दिले नाही. पुढे ते विद्याविहार रेल्वे स्थानकानजीक असलेल्या नीलकंठ बिझनेस पार्कजवळ घेऊन गेले. त्याठिकाणी एक पांढऱ्या रंगाची टोयोटो कोरोला कार उभी होती. या कारमध्ये एक इसम अगोदरपासून बसून होता. स्कुटीवरून घेऊन आलेल्या २२ वर्षीय तरुणाला जबरदस्तीने कारमध्ये बसवले आणि आळीपाळीने तिघांनी अनैसर्गिक संभोग केला. त्यानंतर चौथा इसम आला आणि तो कार चालवू लागला.
चालत्या कारमध्ये असताना तिघांनी त्याच्याजवळील मोबाईल, पर्स काढून घेतले. त्यानंतर महिंद्रा पार्क येथील पेट्रोल पंपावर जाऊन पीडित तरुणाचे क्रेडिट कार्डवरून २ हजार रुपयांचे पेट्रोल भरले आणि २ हजार रोख रक्कम काढून घेतली. त्यानंतर पीडितेला मारहाण करून मोबाईल आणि पाकीट परत देऊन गाडीबाहेर ढकलून दिले. पीडित तरुणाने १०० क्रमांकावर फोन करून मदतीसाठी पाचारण केले. तात्काळ पोलीस घटनास्थळी आले आणि पिडिताला घाटकोपर पोलीस ठाण्यात नेले. गुन्हा घडलेले ठिकाण व्ही. बी. नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याने घाटकोपर पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेऊन तो पुढील तपासकामी व्ही. बी. नगर पोलीस ठाण्यात वर्ग केला. हा गुन्हा भा. दं. वि. कलम ३७७, ३९२, ३२३, ५०४, ३४ अन्वये दाखल केला असून पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक बाबी तपासून तिन्ही आरोपींना अटक केली. गुन्ह्यात वापरलेली स्कुटी (एमएच ०३; डीएच १३२४) आणि टोयोटो कोरोला कार (एमएच ०४; बीडब्ल्यू ५५४८) पोलिसांनी हस्तगत केली आहे.