डहाणू तालुक्यातील कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोर आल्याचा संशयाने ग्रामस्थांनी तीन प्रवाशांची हत्या केल्याची घटना घडली. राज्यात असलेल्या संचारबंदीच्या वातावरणात रात्रीच्या वेळी चोर व दरोडेखोर यांचा ग्रामीण भागात वावर होत असल्याची अफवा गेल्या काही दिवसांपासून डहाणू तालुक्यातील आदिवासी भागांमध्ये पसरली आहे. त्यामुळे या भागामध्ये भीतीचे वातावरण आहे.
अशातच गुरुवारी रात्री तालुक्यातील गडचिंचले येथील ग्रामस्थांनी या मार्गावरून प्रवास करणाऱ्या तीन व्यक्तींना चोर असल्याच्या गैरसमजातून दगड व इतर साहित्याने मारून ठार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गुरुवारी रात्री साडेनऊ ते दहा वाजण्याच्या दरम्यान दाभाडी – खानवेल मार्गावर नाशिककडून येणाऱ्या एका वाहनाला केंद्रशासित प्रदेशाच्या सीमेजवळ गावकऱ्यांनी रोखले. या प्रवाशांकडे विचारपूस केल्यानंतर गावकऱ्यांनी दगड आणि व इतर साहित्याने मारहाण करण्यास सुरुवात केली.
या मारहाणीमध्ये चालकासह दोन प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती कासा पोलिसांनी दिली आहे. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच पोलिसांचा मोठा फौजफाटा पोहोचला. त्यानंतर घटनास्थळी पोलिसांच्या वाहनांची नासधूस केली आहे. काही दिवसांपूर्वी डहाणू तालुक्यातील चारोटी गावाजवळ सारणी गावातदेखील असाच एक प्रकार घडला होता.