पटियाला - येथील पटियाला गुरुद्वारा दु:ख निवारण साहिब येथे आज सकाळी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गुरुद्वारा परिसरात दारुच्या नशेत गुंग असलेली तरुण दारु पीत बसली होती. येथील सरोवरजवळ दारु पित असल्याचे पाहून तिला मॅनेजरच्या कार्यालयात नेण्यात आले. मात्र, तेथे असलेल्या एका व्यक्तीने आपल्या परवानाधारक बंदुकीतून गोळ्या झाडत त्या महिलेची हत्या केली. निर्मलजितसिंह असं या बंदुकधारी व्यक्तीचं नाव आहे. तर, मृत्युमुखी पडलेल्या महिलेचं नाव परमिंदर कौर असून ती पटिलायाची रहिवाशी आहे.
निर्मलजितसिंह यांनी गोळीबार केल्यानंतर या गोळीबारात येथील एका सेवाकरीही जखमी झाला आहे. सागर मल्होत्रा असं या जखमीचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुद्वारा साहिब येथे रात्री उशिरा एक महिला दारु पित बसली होती. त्यावेळी, गुरुद्वारातील सेवेकरांनी महिलेला दारु न पिता इथून जाण्याचे बजावले. मात्र, महिलेनं त्यांच्याशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी, जवळच असलेल्या व्यक्तीने स्वत:जवळील बंदुक बाहेर काढली आणि गोळी झाडून महिलेची हत्या केली. या घटनेत एक सेवेकरीही जखमी झाला.
या घटनेनंतर महिला आणि सेवेकऱ्यास सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे महिलेला मृत घोषित करण्यात आले, तर सेवेकरी व्यक्तीवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी व्यक्तीचा जबाब नोंद करुन घेतला आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे.