बिहारमधील बक्सर येथून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे एका महिलेचा निष्काळजीपणा तिच्याच अंगलट आला. या महिलेने गुळाची भेली समजून बॉम्ब जमिनीवर फेकला. यानंतर मोठा स्फोट झाला आणि महिला गंभीर रित्या जखमी झाली. या स्फोटाचा आवाज एवढा मोठा होता की, तो ऐकून महिलेच्या कुटुंबीयांसह आजूबाजूच्या लोकांनाही धक्का बसला. संबंधित महिलेला गंभीर अवस्थेत उपचारासाठी वाराणसीला रेफर करण्यात आले आहे.
ही घटना बक्सरच्या इटाढी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाला देवा गावात घडली. येथील रामनाथ राम यांच्या घरी एक बॉम्ब ठेवण्यात आला होता. रामनाथ यांची पत्नी शांती शनिवारी सकाळच्या सुमारास या बॉम्बला गुळाची भेली समजून गच्चीवर घेऊन गेली आणि तो तोडू लागली. मात्र याच वेळी त्यात स्फोट झाला. या बॉम्बच्या आवाजाने संपूर्ण घर हादरले.
या स्फोटाचा आवाज ऐकून संबंधित महिलेचे कुटुंबीय आणि शेजारील लोक गच्चीवर पोहोचले. यावेळी शांती गंभीर अवस्थेत तेथे पडलेली होती. यानंतर, पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली आणि शांतीला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र येथे शांतीची प्रकृती पाहता तिला वाराणसीला रेफर करण्यात आले आहे.
यासंदर्भात माहिती देताना बक्सर एसपी मनीष कुमार म्हणाले, प्रकरण गंभीर असल्याने बॉम्बशोधक पथक आणि एफएसएल टीमलाही घटनास्थळी पाठवण्यात आले होते. हा बॉम्ब कुठून आला? यासंदर्भात महिलेच्या पतीची चौकशी केली जात आहे. याशिवाय शेजारच्या लोकांनाही विचारपूस करण्यात आली आहे. यासंदर्भात शोध सुरू आहे.