धक्कादायक! फेसबुक लव्हरसाठी महिलेने नवजात मुलाला सोडले, प्रँकमध्ये मुलासह तिघेजण जीवानिशी गेले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2021 01:39 PM2021-07-04T13:39:59+5:302021-07-04T13:41:28+5:30
Crime News: एक महिला आपल्या नवजात बाळाला सोडून फेसबुक लव्हरसोबत पळून गेली. यादरम्यान संपूर्ण घटना प्रँकच्या स्वरूपात पुढे आली आहे. मात्र या सर्व घडामोडीत महिलेच्या दोन नातेवाईकांसह तिच्या नवजात मुलाचा मृत्यू झाला आहे.
तिरुवनंतपुरम - केरळमधील कोल्लम जिल्ह्यामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील कल्लूवथुक्कल गावातील रहिवासी असलेली एक महिला आपल्या नवजात बाळाला सोडून फेसबुक लव्हरसोबत पळून गेली. (Crime News) यादरम्यान संपूर्ण घटना प्रँकच्या स्वरूपात पुढे आली आहे. मात्र या सर्व घडामोडीत महिलेच्या दोन नातेवाईकांसह तिच्या नवजात मुलाचा मृत्यू झाला आहे. (Woman leaves newborn baby for Facebook lover, three die in prank)
केरळ पोलिसांनी अत्यंत चपळाईने तपास करत या प्रकरणाचा छडा लावला आहे. रेश्मा नावाच्या या महिलेच्या तथाकथित फेसबुक लव्हरचे अकाऊंट तिच्याच दोन नातेवाईकांकडून चालवण्यात येत असल्याचे तपासात उघड झाले. म्हणजेच हे दोन नातेवाईक प्रियकर बनून रेश्माशी बोलत होत्या. मात्र पोलिसांकडून पकडले जाण्याच्या आणि प्रँक चुकीच्या दिशेने जात असल्याच्या भीतीने या दोघींनीही आत्महत्या केली.
२४ वर्षीय रेश्माला पोलिसांनी तिच्या नवजात मुलाच्या हत्येप्रकरणी अटक केली. तिच्यावर तिच्या मुलाला कोल्लम जिल्ह्यातील कल्लूवथुक्कल गावातील एका रबराच्या शेतात सोडून गेल्याचा आणि हत्या केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. या मुलाचा मृत्यू रुग्णालयात उपचारांदरम्यान झाला होता.
रेश्माला अटक करण्यात पोलिसांना अपयश येत होते. मृत नवजात मुलाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांना अनेक महिलांचे डीएनए सँपल घेतले होते. त्यानंतर २२ जून रोजी रेश्माला अटक करण्यात आली.
रेश्माने पोलिसांना सांगितले की, तिच्या मित्राने तिला सांगितले होते की तो तिला कुठल्याही अन्य मुलासह स्वीकारू शकतो. एसीपी वाय. निजा मुद्दीन यांनी सांगितले की. २४ वर्षीय रेश्मा हिचा पती विष्णू हा चार महिन्यांपूर्वी कामानिमित्त आखाती देशांत गेला होता. त्यानंतर रेश्मा हिची फेसबुकवरून कुठल्यातरी व्यक्तीशी मैत्री झाली होती. यादरम्यान, ती गर्भवती होती. दरम्यान, फेसबुकवरील मित्राशी असलेली तिची मैत्री प्रेमात बदलली होती. मात्र ती गर्भवती असल्याचे तिने तिच्या घरात कुणाला सांगितले नव्हते.
रेश्मा ही तिची चुलत बहीण आर्याकडून घेतलेले सिमकार्ड वापरत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर रेश्माला अटक झाल्यावर पोलिसांनी तिच्या या बहिणीलाही समन्स बजावले आहे. याच सिमकार्डचा वापर फेसबुक फ्रेंडशी संपर्क करण्यासाठी झाला असल्याचा पोलिसांना संशय होता.
मात्र हे समन्स बजावल्यानंतर एका दिवसानंतर आर्या आणि रेश्माच्या वहिनीची मुलगी ग्रीष्मा ह्या बेपत्ता झाल्या. दोघांचेही मृतदेह तिच्या घराजवळच्या नदीकिनाऱ्यावर सापडले. या दोघीही चांगल्या मैत्रिणी होत्या. एसीपींनी सांगितले की, आम्हाला ग्रीष्माच्या प्रियकराकडून माहिती मिळाली होती. ग्रीष्माने सांगितले की, तिचा प्रियकर रेश्मा हिच्यासोबत प्रँक करत होता. तसेच परिस्थिती हाताबाहेर गेली होती. पोलिसांनी समन्स बजावल्यानंतर आर्याने तिच्या सासूला संपूर्ण माहिती सांगितली. जेव्हा तिची सासू कामावर गेली तेव्हा तिने ग्रीष्मासोबच नदीत उडी मारून आत्महत्या केली.