मुंबई - १४ वर्षीय अल्पवयीन मुलाने छताला दोरी बांधून आत्महत्या केल्याची घटना मानखुर्द येथील बालगृहाच्या परिसरात सोमवारी दुपारी चारच्या दरम्यान घडली. गोवंडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात पाठविला असून आत्महत्येचे कारण कळू शकलेले नाही.मानखुर्दच्या आगरवाडी येथे चिल्ड्रेन्स एड सोसायटीअंतर्गत असलेले बाल कल्याण नगरी हे बालगृह आहे. या बालगृहामधील नवव्या इयत्तेत शिकणाऱ्या १२ वर्षांच्या मुलाने सोमवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. हा अल्पवयीन मुलगा पुण्याचा असून नेपाळी समाजाचा होता. या मुलाच्या वडिलांचा मृत्यू झाला असून आईला या मुलाला सांभाळता येत नसल्याने दोन वर्षांपूर्वी त्याला बालगृहात प्रवेश देण्यात आला होता. गेल्या काही दिवसांपासून तो हळव्या मन:स्थितीत असायचा असे समजते. तो राहत असलेल्या खोलीमधील इतर मुले सोमवारी सायंकाळी अभ्यासासाठी बाहेर गेली होती. बालसुधारगृहातील मुलांच्या झोपण्याच्या खोलीत कपडे वाळत घालण्यासाठी बांधलेली दोरी त्याने राहत असलेल्या कुटीरमध्ये छताला बांधून आत्महत्या केली. त्यानंतर त्याच्यासोबतची अभ्यासासाठी गेलेली मुले अभ्यास करून परतल्यानंतर हा प्रकार निदर्शनास आला. या प्रकाराने घाबरलेल्या मुलांनी तत्काळ बालगृहातील कर्मचाऱ्यांना याविषयी सांगितले. या घटनेची माहिती मिळताच अधीक्षकांनी गोवंडी पोलिसांना कळवले.पोलिसांनी त्याला गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयात नेले. तेथील डॉक्टरांनी मृत घोषित केल्यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात पाठवण्यात आला. आत्महत्येचे कारण अद्याप न समजल्याने याबाबत गोवंडी पोलीस अधिक तपास करत आहेत. या घटनेची गोवंडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.