डोंबिवली - रेल्वे रुळ ओलांडताना एका तरूणीला आपला जीव गमवावा लागला आहे. लोकल ट्रेनने दिलेल्या धडकेत तरुणीचा मृत्यू झाला. अंतिमादेवी रामाजून दुबे (२८) असं या तरुणीचं नाव आहे. कल्याणरेल्वे स्थानकादरम्यान रुळावर ही घटना घडली. तरुणीला लोकलची धडक लागल्याने अपघाती मृत्यू झाल्याची घटना कल्याण रेल्वे स्थानकात बुधवारी सकाळी ९ वाजून ४५ मिनिटांनी घडली. अंतिमादेवी रामाजून दुबे (२८) असे त्या युवतीचे नाव असून ती पूर्वेकडील साकेत महाविद्यालयात शिक्षण घेत असल्याची माहिती कल्याण लोहमार्ग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक व्ही.डी.शार्दुल यांनी दिली.
शार्दूल म्हणाले की, लोकलच्या धडकेत त्या युवतीचा अपघाती मृत्यू झाला. पण स्थानकात रुग्णावाहिका नसल्याने वेळेत उपचार होऊ शकले नाहीत आणि पोलिसांनी अपघाती युवतीला स्ट्रेचरवरूनच इस्पितळात दाखल केले, त्यात तिचा मृत्यू झाल्याची रेल्वे स्थानक परिसरात सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. ती अशोका बि. लोकउद्यान, सांगळेवाडी कल्याण पश्चिम येथे वास्तव्याला होती. ती सकाळी ९.४५ येथे फलाट क्रमांक १वरील मुंबई दिशेकडील बाजूने किमी. ५२/९४ जवळून रेल्वे रुळ ओलांडत असताना के१९ डाऊन या मुंबई कल्याण लोकलची धडक बसल्याने हा अपघात झाला. त्यानूसार कल्याण स्थानक प्रबंधकांना अपघाताची माहिती मिळताच त्यांनी पोलिसांना १० वाजून १८ मिनिटांनी मेमो दिला आणि ११ वाजून ५ मिनिटांनी पोलिसांनी तिला रुक्मिणीबाई इस्पितळात नेले, पण तेथे नेण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केल्याचे शार्दुल म्हणाले. तिच्या कुटूंबियांनी तिची ओळख पटवली आहे.
दरम्यान, कल्याण रेल्वे स्थानकात रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने अपघात घडल्यास तातडीने जखमींना उपचारासाठी इस्पितळात नेण्याची सुविधा उपलब्ध होत नसल्याने पोलिस यंत्रणेची गैरसोय होत आहे. बुधवारच्या घटनेतही मयत युवतीला वेळेत उपचार न मिळाल्याने तिचा मृत्यू झाला असल्याची चर्चा स्थानक परिसरात सुरु होती. पोलिस यंत्रणेने त्या वृत्ताला दुजोरा दिला नसला तरी रुग्णवाहिका नाही हे मात्र मान्य केले. तसेच पोलिसांनी मयताला स्ट्रेचरवरुनच रुग्णालयात नेल्याची धक्कादायक माहितीही शार्दुल यांनी दिली. पण आजच्या घटनेत धडक बसल्यानंतर जागीच तिचा मृत्यू झाला असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू झाला असे म्हणणे संयुक्तिक नसल्याचे ते म्हणाले. स्थानक प्रबंधकांचा मेमो मिळाल्यानंतर अन्य बाबींचा उलगडा होणार असल्याचेही सांगण्यात आले. रूळ ओलांडून न जाण्याचं आवाहन रेल्वे प्रशासन वारंवार प्रवाशांना करते. याबाबत अनेकदा जनजागृतीही केली आहे. मात्र, अनेक प्रवासी आपला जीव धोक्यात घालून रेल्वे रूळ ओलांडतात.