वाशिम : बोरगाव (ता.मालेगाव) येथील जिल्हा परिषद शाळेवर कार्यरत असलेले शिक्षक दिलीप सोनोने (५३) यांना मालेगाव-बोरगाव मार्गावरील कोल्ही गावानजीक अज्ञात इसमांनी राॅडने मारून व पेट्रोल टाकून जिवंत जाळल्याची हृदयद्रावक व धक्कादायक घटना सोमवार, ९ आक्टोबर रोजी सकाळी १०:३० वाजता दरम्यान घडली. यामागील कारण अस्पष्ट असून, घटनेचा पुढील तपास जऊळका रेल्वे पोलिस स्टेशनची चमू करीत आहे.
दिलीप सोनोने हे जिल्हा परिषद शाळेवर सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. मागील पाच ते सहा वर्षांपासून मालेगाव तालुक्यातील बोरगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सहाय्यक शिक्षक म्हणून कर्तव्य बजावत आहेत. सोमवार, ९ ऑक्टोबर रोजी सकाळी १०:३० वाजता ते एमएच ३७ वाय १४३८ क्रमांकाच्या दुचाकीने मालेगाववरुन बोरगाव येथील जिल्हा परिषद शाळेवर आपले कर्तव्य बजावण्यासाठी जात होते.
आड वाटेतच कोल्ही शिवारात दुचाकीवरून आलेल्या अज्ञात इसमांनी त्यांना अडविले आणि लोखंडी राॅडने जबर मारहाण केली. अज्ञात इसम एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी पेट्रोल टाकून दिलीप सोनोने यांना जिवंत जाळले. घटनेची माहिती मिळताच जऊळका रेल्वे पोलिस स्टेशनचे ठाणेदार प्रदीपकुमार राठोड यांच्यासह फॉरेन्सिक एक्सपर्टची टीम घटनास्थळी दाखल झाली. गंभीर जखमी अवस्थेत सोनोने यांना प्रथम मालेगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले; परंतू प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना वाशिम येथील खासगी दवाखान्यात हलविले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. जऊळका रेल्वे पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून, अज्ञात आरोपींना शोधून काढण्याचे मोठे आव्हान पोलिसांना पेलावे लागणार आहे. या घटनेचा पुढील तपास ठाणेदार प्रदीपकुमार राठोड करत आहेत.
वैयक्तिक वादाची किनार?वैयक्तिक वादातून अज्ञात इसमांनी दिलीप सोनोने यांना राॅडने मारहाण करून जीवंत जाळल्याची चर्चा आहे. या घटनेमागे नेमके काय कारण आहे? याचा शोध पोलिस घेत आहेत.आरोपीच्या शोधासाठी पोलिस पथकेया घटनेतील अज्ञात आरोपींना शोधून काढण्यासाठी पोलिसांनी तपासाला गती दिली असून, पथकेही नियुक्त केली. लवकरच आरोपीचा शोध घेवून जेरबंद केले जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला.शिक्षण क्षेत्रातून संतप्त प्रतिक्रियाजिल्हा परिषद शिक्षकाला जीवंत जाळल्याने शिक्षण क्षेत्रातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. या घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या शिक्षकांसह इतरही शिक्षकांमधून होत आहे.