नवी दिल्ली : बॉलिवूडचा शहेनशहा अमिताभ बच्चन होस्ट करत असलेला प्रसिद्ध कार्यक्रम कौन बनेगा करोडपतीवरून संरक्षण मंत्रालयाने गंभीर इशारा दिला आहे. सोशल मिडीयावर अनेक खाती पाकिस्तानातून संचलित केली जात असून संरक्षण खात्याच्या चौकशीतून हे समोर आले आहे.
पाकिस्तानी टोळ्या भारतीयांना केबीसीच्या खोट्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर जोडण्यास सांगत आहेत. यानंतर लोकांना या कार्यक्रमाचे खोटे मॅसेज पाठविण्यास सांगण्यात येते. याद्वारे पाकिस्तानी सोशल मिडीया खात्यांकडे लोकांची माहिती गोळा करत आहेत आणि पाकिस्तानला हवी तशी माहिती पसरविण्यात येत असल्याने सैन्यदलाने सांगितले.
संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, नागरिकांनी अशा ग्रुपमधून तत्काळ बाहेर पडावे. अनेक व्हॉट्सअॅप ग्रुपवरील दोन कॉमन पाकिस्तानी ग्रुप अॅडमीनचा शोध लावण्यात आला आहे. या नंबरवरून लोकांना खोटे मॅसेज पाठविले जात आहेत.
काश्मीरवरून अपप्रचारकाश्मीरचा नुकताच विशेष राज्याचा दर्जा काढून घेण्यात आला आहे. यामुळे पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणांनी भारताविरोधात सायबर जगतात मोहिम उघडली आहे. या आभासी जगातून पाकिस्तानकडून भारतीय संरक्षण दलांना विशेष लक्ष्य केले जात आहे. संरक्षण खात्याने आजी आणि माजी अधिकाऱ्यांच्या नावे जवळपास 200 पेक्षा जास्त ट्विटर खाती शोधली आहेत. या खात्यांवरून पाकिस्तानच्या बाजुने प्रचार केला जात होता. तक्रारी प्राप्त झाल्यानंतर हा प्रकार उघड झाला.