औरंगाबाद : आपल्याला नाकारणाऱ्या मुलीसोबत तुम्ही सोयरीक करू नका, अशी धमकीपत्रे टाकत नकार मिळालेल्या तरुणाने नियोजित नवरदेवाच्या हॉटेलवर गोळीबार केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास पडेगावातील रामगोपालनगरात घडली. याप्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयिताला पकडण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे. संशयित आरोपी हा तक्रारदाराचा चुलत भाचा असल्याचे सूत्राने सांगितले. विशाल मनोहर गाडीलकर (रा. कोपर्डी, ता. पारनेर, जि. अहमदनगर) असे संशयिताचे नाव आहे. यावेळी त्याच्यासोबत अन्य एक जण होता. तक्रारदार मनीष किसनराव गायकवाड या तरुणाचे पडेगाव येथे हॉटेल आहे. अहमदनगर जिल्ह्यातील चुलत मामाच्या मुलीसोबत मनीषचा विवाह २५ एप्रिल रोजी होणार आहे. मनीषचे लग्न जमण्यापूर्वी आरोपी विशालने त्या तरुणीला लग्नाची मागणी घातली होती. मात्र, तिच्या आईवडिलांनी विशालचे स्थळ नाकारले होते. आपल्याला नाकारणाऱ्या मुलीचे लग्न चुलत मामा मनीषसोबत जमल्याचे विशाल आणि त्याच्या नातेवाइकांना समजले. त्यानंतर त्यांनी गायकवाड कुटुंबावर सोयरीक मोडण्यासाठी दबाव टाकायला सुरुवात केली. मात्र, तरीही गायकवाड कुटुंबाने मनीष आणि त्या तरुणीचा विवाह निश्चित केला. त्यानंतर आरोपी विशालने मनीषचे वडील किसन गायकवाड यांच्या व्हॉट्सॲपवर मेसेज पाठवून त्या मुलीचा विचार सोडा असे नमूद केले होते. गायकवाड कुटुंबाने त्या मेसेजकडे दुर्लक्ष केले होते. तब्बल १९ प्रतीत धमकीपत्र फेकले गायकवाड यांना घराच्या आवारात धमकी पत्राचा गठ्ठा आढळून आला. यानंतर त्यांनी सीसीटीव्ही फुटेज पाहिले. त्यात दुचाकीस्वार दोन तरुण त्यांच्या हॉटेलसमोर आल्याचे त्यांना दिसले. यापैकी हेल्मेट घातलेला तरुण कंपाउंड वॉलबाहेरून धमकी पत्र टाकतो व नंतर तो लॉजिंगच्या दिशेने येतो. पिस्तुलातून पहिल्या मजल्यावरील खिडकीवर गोळी झाडतो. यानंतर दुसरी गोळी स्वागत कक्षाच्या काचेवर झाडतो आणि साथीदाराच्या दुचाकीवर बसून पळून गेल्याचे दिसले. गोळीबार करणारा विशाल असल्याचा संशय बळावल्याने मनीषने त्याच्यासह अन्य आरोपीविरुद्ध छावणी ठाण्यात तक्रार नोंदविली.
नियोजित नवरदेवाच्या हॉटेलवर गोळीबार, औरंगाबादमधील खळबळजनक घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2021 7:51 AM