मुंबई : मालाड पश्चिम परिसरातील म्युझिकल इन्स्ट्रूमेंटची विक्री करणाऱ्या दुकानात गिटारचे ऑनलाइन पेमेंट करताना हजारोंची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी दुकानदाराने मालाड पोलिसात धाव घेतली असून, दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदार अमित मोहने हे दुकान चालक आहेत. चिंचोली बंदर रोड परिसरात म्युझिकल इन्स्ट्रूमेंट विक्री करण्याचे दुकान ते चालवतात. त्यांच्या तक्रारीनुसार ३० ऑक्टोबर रोजी संध्याकाळी दुकानात दोन अनोळखी व्यक्ती आले आणि त्यातील एकाने त्यांना इलेक्ट्रिक गिटार दाखवायला सांगितले. त्यानुसार त्यांनी १८,९९० रुपये किमतीचे गिटार त्यांना दाखवले.
सोबत १०,३०० चे स्पीकर ही त्याने पाहिले. या दोन्ही वस्तू एकूण २५, ८०० रुपयात देण्याची विनंती त्यांनी केली. मोहने यांनी होकार दिल्याने आरोपींनी ती रक्कम फोन पे द्वारे पाठवल्याचे सांगत स्वतःच्या मोबाइलमध्ये त्याचा यूपीआय आयडी दाखवला.
...परंतू पैसे खात्यात आलेच नाहीततसेच स्वतःचे नाव जय असल्याचे सांगत मोबाइल नंबरही दिला आणि नंतर गिटार व स्पीकर घेऊन ते निघून गेले. मात्र पेमेंट न मिळाल्याने मोहने यांनी जयला मोबाइलवर संपर्क केला, मात्र तो बंद होता. त्यांनी बँकेत जाऊन चौकशी केल्यानंतर त्यांचे पैसे खात्यात आलेच नाहीत.गेल्या काही दिवसांपासून अशा प्रकारच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे खरेदी करताना काळजी घेण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.